बारा दिवस उलटूनही  खुलाशासह अभिप्राय येईना 

दौलत झावरे
Monday, 13 July 2020

"सामान्य'ने कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषद सदस्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्यावर "सामान्य'कडून कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नगर : खासगी व्यक्तीची नियुक्ती करून त्याच्याकडून जिल्हा परिषदेतील कामे करून घेतली जात असल्याच्या प्रकरणाला "सकाळ'ने वाचा फोडली. त्यानंतर सामान्य प्रशासनाने तातडीने तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलाशासह विभागप्रमुखाचा अभिप्राय तीन दिवसांत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याला बारा दिवसांचा कालावधी लोटूनही "सामान्य'ला खुलाशासह अभिप्राय प्राप्त झालेला नाही. 

हेही वाचा ः जिल्हा परिषदेच्या इमारतीचे दिवसातून दोनदा सॅनिटाईझ करा हो...

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागामध्ये खासगी व्यक्तींकडून संगणकावरील कामे करून घेतली जात आहेत. "खासगी'चा इतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजात हस्तक्षेप वाढल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सुरू झाली.

अवश्य वाचा ः अंबालिका साखर कारखान्याने दिला एवढा भाव
 

"सकाळ'ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारून तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून तीन दिवसांत खुलाशासह विभागप्रमुखाचा अभिप्राय सादर करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, त्याला बारा दिवस उलटूनही खुलाशासह अभिप्राय "सामान्य'ला प्राप्त झालेला नाही. या प्रकरणी "सामान्य'ने कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषद सदस्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्यावर "सामान्य'कडून कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विशेष म्हणजे, बांधकामच्या उत्तर व दक्षिण अशा दोन्ही विभागांत "ती' व्यक्ती काम करीत असताना, फक्त "दक्षिण'लाच नोटिसा देण्यात आलेल्या असून, त्यात ज्यांचा संबंध नाही अशांचा समावेश असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः हाती घेऊन, ती व्यक्ती कोणकोणत्या विभागात काम करीत होती याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve days later No feedback