
उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाला.
संगमनेर (नगर) : उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाल्याने, शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाल्याची घटना प्रतापपूर शिवारात मंगळवारी ( ता. 06 ) दुपारी एकच्या सुमारास घडली.
प्रतापपूर येथील पांडूरंग भिकाजी आंधळे यांचे आश्वी बुद्रूक ते प्रतापपूर शिवेवर गट क्रमांक 508 मध्ये अडीच एकर उसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात तोडणीला आलेला ऊस होता. शेतातील विंधन विहीरीवरील विजपंपासाठी शेतावरुन विजवाहक तारा ओढण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारी या तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे ठिणग्या पडून लागलेली आग चांगलीच भडकली.
ही घटना पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर तसेच ऊस तोडून जाळपट्टे तयार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेवून आग विझवली. या घटनेत पांडुरंग आंधळे यांचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले