
स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्याच्या कारणावरून स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यात झालेल्या वादाचे रुपांतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे.
शेवगाव (नगर) : स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्याच्या कारणावरून स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यात झालेल्या वादाचे रुपांतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे. त्यासंदर्भात शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील भास्कर सर्जेराव शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सिताराम श्रीपती करंजे व कडुबाळ दादा भुमकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सिताराम करंजे यांच्या मुलीच्या फिर्यादीवरुन भास्कर सर्जेराव शिरसाठ यांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार (ता.२७) रोजी सायंकाळी साडेसात वाजता मठाचीवाडी येथील करंजे वस्तीवर गेलो असता, सिताराम करंजे व कडुबाळ भुमकर यांनी भास्कर शिरसाठ यांना धान्य देण्यास नकार देऊन गचांडी पकडून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे तपास करीत आहेत.
करंजे यानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानातून वडीलांच्या वाटयाचे धान्य मुलीचा अंगठा घेतल्याशिवाय ते देता येत नाही. याचा राग धरुन भास्कर शिरसाठ यांनी माझा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावर तुमच्या नव-याची नोकरी घालवतो व तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो असा दम दिला. या फिर्यादीवरुन पोलीसांनी भास्कर शिरसाठ यांच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा बुधवार (ता.३०) दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार बाळासाहेब ताके करीत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले