नाशिक-पुणे पावणेदोन तासांत, स्थानिकांना रेल्वेमुळे हा होणार फायदा

आनंद गायकवाड
Tuesday, 4 August 2020

या मार्गावरील रेल्वेस्थानकांत प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या कामात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

संगमनेर ः शासनाचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड डबल लाइन रेल्वेप्रकल्प कोरोनाच्या संकटातही विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यातर्फे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी पवार म्हणाले, की औद्योगिक व कृषी विकासात अव्वल असलेल्या पुणे व नाशिक या दोन स्मार्ट सिटींना जोडणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांतील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय व उद्योगक्षेत्राला गती मिळणार आहे.

हेही वाचा - कर्जमाफी हवी असेल तर हे करा

प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चातील या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवास अवघ्या पावणेदोन तासांत होईल. 
बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.

या मार्गावरील रेल्वेस्थानकांत प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या कामात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पाठपुरावा व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येईल. प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा घेणार नसल्याचेही मंत्री पवार यांनी स्पष्ट केले. 

  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये 
  • - तीन जिल्ह्यांतून जाणारा 235 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग 
  • - 200 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार 
  • - नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांत कापणार 
  • - वेळेसह इंधनाची बचत करणारा पर्यावरणपूरक प्रकल्प 
  • - पुणे-नाशिकदरम्यान 24 स्थानके, 18 बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित 
  • - प्रवासी, मालवाहतूक चालणार 
  • - विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वेमार्गांचे बांधकाम होणार 
  •  
  • संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In two hours from Nashik to Pune, the locals will benefit from the railway