बिबट्याशी झुंज देऊन दोघांनी करुन घेतली त्याच्या तावडीतून सुटका

विलास कुलकर्णी
Tuesday, 8 December 2020

बुळे पठार (चिखलठाण) येथे सोमवारी (काल) रात्री नऊ वाजता बिबट्याने दोन जणांवर हल्ला चढविला.

राहुरी (अहमदनगर) : बुळे पठार (चिखलठाण) येथे सोमवारी (काल) रात्री नऊ वाजता बिबट्याने दोन जणांवर हल्ला चढविला. एकाच्या हाताला तर दुसऱ्याच्या पोटाला गंभीर जखमा केले आहे. बिबट्याशी झुंज देऊन, दोघांनी त्याच्या तावडीतून स्वतः ची सुटका केली. नशीब बलवत्तर असल्याने दोघांचे प्राण वाचले.

तहाराबाद येथे ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी व एक वासरू जखमी झाले. 
मच्छिंद्र किसन दुधावडे व तानाजी हरिबा केदार (दोघेही रा. बुळे पठार, चिखलठाण) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमींची नावे आहेत.

घटनेची माहिती अशी : काल रात्री नऊ वाजता जिल्हा परिषद शाळे जवळील लक्ष्मीआई मंदिरासमोर मच्छिंद्र दुधावडे शेकोटी करून बसले होते. जवळच त्यांचे घर आहे. घराजवळ मोकळ्या पटांगणात त्यांच्या दोन गायी व दोन वासरे बांधले होते.  बिबट्याने मोठ्या खिलारी गाईवर हल्ला चढविला. गाया ओरडायला लागल्या. त्यांचा आवाज ऐकून घरातील महिलांनी मोठ्याने आरडाओरडा केला. महिलांचा आवाज ऐकल्यावर दुधावडे तात्काळ घरात गेले. बॅटरी घेऊन, गायां जवळ गेले. तोपर्यंत बिबट्या पसार झाला. 

बॅटरीच्या उजेडात अचानक बिबट्या समोर प्रगटला. बिबट्याने दुधावडे यांच्यावर हल्ला चढविला. दुधावडे यांचा डावा हात बिबट्याच्या जबड्यात गेला. दुधावडे यांनी बिबट्याच्या मानेला कवळी घातली. जबड्यात उजवा हात घालून, डावा हात बाहेर काढला. स्वतःची सुटका करून, घरात जाण्यासाठी पळ काढला. या झटापटीत पळतांना दुधावडे तोंडावर आपटले. त्यांच्यावर मागून हल्ला करण्यासाठी आलेला बिबट्या त्यांच्या अंगावरून पुढे गेला. बिबट्या परत माघारी हल्ल्यासाठी वळला. परंतु, दुधावडे यांनी चपळाईने उठून घरात प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

बिबट्याने दुधावडे यांच्या घरा मागील रस्त्यावर मोर्चा वळविला. दुधावडे यांच्या घराकडे सुरू असलेला आरडाओरडा ऐकून त्यांचे शेजारी तानाजी केदार रस्त्यावरून येत होते. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. केदार यांच्या हातावर व पोटावर बिबट्याच्या पंजाचा फटका बसला. केदार यांनी स्वेटर घातले असल्याने, पोटाला किरकोळ जखम झाली. हातावर पंजाची जखम झाली. नंतर, बिबट्याने यशवंत गंगाधर बुळे यांच्या गायीवर व वासरावर हल्ला चढविला. गाय जखमी झाली. वासरू गंभीर जखमी झाले. आरडाओरडा वाढल्याने, आसपासच्या घरातील ग्रामस्थ मदतीला धावले. जमाव पाहून बिबट्याने धूम ठोकली.

आज (मंगळवारी) सकाळी दोन्ही जखमी तहाराबाद येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. परंतु, दुपारी बारा वाजेपर्यंत वनखात्याचा एकही अधिकारी जखमींची विचारपूस करण्यासाठी आलेल्या नव्हता.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two injured in leopard attack in Rahuri taluka