
सोमवारी रात्री चांदबीबी महाल परिसरात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले. या भागात बिबट्यांचे वास्तव्य तीन महिन्यांपासून आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून वन विभागाने नागरिकांना या भागात रात्री-अपरात्री फिरण्यास बंदी घातली आहे.
अहमदनगर : चांदबीबी महालाच्या परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना सायंकाळी पाच ते सकाळी आठदरम्यान त्या परिसरात फिरू नये, अशा सूचना जारी केल्या आहेत. या सूचना चांदबीबी महाल परिसरात लावल्या आहेत.
सोमवारी रात्री चांदबीबी महाल परिसरात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले. या भागात बिबट्यांचे वास्तव्य तीन महिन्यांपासून आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून वन विभागाने नागरिकांना या भागात रात्री-अपरात्री फिरण्यास बंदी घातली आहे. सायंकाळी पाच ते सकाळी आठदरम्यान नागरिकांनी महालाकडे अथवा महालाच्या रस्त्याने फिरायला जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी केले आहे.
यासाठी वन विभागाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. यात वनरक्षक कानिफ साबळे, सचिन शिंदे, रामभाऊ लिपणे, चिमाजी थोरात, शंकर थोरात, बाबा शिरसाठ, अशोक साठे, पोपट बनसोडे, रावसाहेब भिंगारदिवे आदींचा समावेश आहे.
सुनील थेटे, मंदार साबळे, तसेच प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल अशोक शेरमाळे यांनी मंगळवारी सायंकाळी व रात्री या भागात फिरून पाहणी केली. सायंकाळनंतर महालावर थांबलेल्या नागरिकांना वन विभागाच्या पथकाने तेथे न थांबण्याच्या सूचना केल्या. महालाच्या जवळचा काही भाग संरक्षित वनक्षेत्रात येतो. याच भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. नागरिकांना न फिरण्याच्या सूचना दिल्या तरीही नागरिक ऐकत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे थेटे यांनी सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले