esakal | व्यापाऱ्यांना झुकते माप तर शेतकऱ्यांची अडवणूक; शेवगाव तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Types at Cotton Shopping Center in Shevgaon taluka

शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमी भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडून मोठया प्रमाणात व्यापाऱ्यांचाच कापूस विक्रीसाठी येत आहे.

व्यापाऱ्यांना झुकते माप तर शेतकऱ्यांची अडवणूक; शेवगाव तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमी भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडून मोठया प्रमाणात व्यापाऱ्यांचाच कापूस विक्रीसाठी येत आहे.

कापूस विक्रीसाठी आँनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्द्रता जास्त आहे. प्रतवारी कमी आहे. या कारणाने टाळाटाळ केली जाते. त्यामुळे हे खरेदी केंद्र नेमके कोणाच्या सोयीसाठी सुरु आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

केंद्र सरकारने भारतीय कपास निगम मार्फत (सीसीआय)१९ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरु केले. बाजार समितीने गर्दी टाळण्यासाठी व शेतक-यांमध्ये सुसुत्रता येण्यासाठी आँनलाईन नोंदणी प्रक्रिया राबवली. त्यानुसार तालुक्यातील १० हजार ६६८ शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ठेवण्यासाठी गोदाम, गाठी बनवण्यासाठी जिनींग प्रेसींग यंत्रणा व पाण्याची सुविधा असल्याने रिध्दी सिध्दी येथे चार दिवस तर दुर्गा फायबर्स येथे दोन दिवस सीसीआय मार्फत कापूस खरेदी होते. 

दररोज किमान ७० वाहनांतील दोन हजार ते दोन हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी होते. त्यातील दोन हजार ५३७ शेतक-यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर अदयापही आठ हजार १०१ शेतक-यांकडील कापसाची खरेदी बाकी आहे. आतापर्यंत मात्र या खरेदी केंद्रावर शेतक-यांना सापत्न वागणूक देत व्यापा-यांना मोकळा हात सोडला जातो. बहुतांशी शेतक-यांना आर्द्रता व प्रतवारीमुळे माल पाठीमागे न्यायला प्रवृत्त केले जाते. 

आँनलाईन शेतक-यांच्या नावावर नोंदणी केलेल्या खाजगी व्यापा-यांना मात्र झुकते माप दिले जाते. नोंदणी केलेल्या शेतक-यांना माल घेवून येण्यासाठी संदेश व फोनव्दारे कळविणे आवश्यक असतांना ती देखील तसदी घेतली जात नाही. त्यामुळे शेतक-यांची चौकशीसाठी वारंवार ससेहोलपट होते.

खाजगी व्यापारी सी.सी.आयने नाकारलेला कमी दर्जाचा कापूस बाहेर साडेचार ते पाच हजाराच्या आसपास दराने खरेदी करतात. आणि तोच कापूस प्रतिक्विंटल पाच हजार ४०० ते पाच हजार ७०० रुपये दराने या केंद्रावर शेतक-याच्या नावावर घालतात. त्यांच्या मालाच्या आर्द्रतेची व प्रतवारीची शहानिशा केली जात नाही. त्यामुळे या केंद्रातील संपूर्ण खरेदी व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे. 

नाव नोंदणी करतांना शेतक-याचा सातबारा उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक यांची प्रत घेतली जाते. त्यामुळे अशी कागदोपत्रांची पर्तता करणा-या सर्वांचीच नोंदणी करुन कापूस खरेदी केला जातो. काही शेतकरी व्यापा-यांना स्वत:च्या नावे कापूस देण्यासाठी कागदपत्रे देत असतील तर याबाबत आमचाही नाईलाज आहे, असे सीसीआय केंद्राचे संचालक शिवाजी पंडीत यांनी सांगितले.

अनेक वर्षापासून हे केंद्र सुरु असून तेथील सी.सी.आयचे अधिकारी ही तेच आहेत. त्यामुळे त्यांचे स्थानिक व्यापा-यांशी लागेबांधे निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे केंद्र शेतक-यांच्या सोयीसाठी सुरु आहे. असे भासवले जात असले तरी सोय मात्र व्यापा-यांचीच होते.
- संजय नांगरे, सचिव, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष