उजनी चारी उपसा जलसिंचन योजना झाली सुरू, आमदार आशुतोष काळेंनी शब्द पाळला

उजनी चारी उपसा जलसिंचन योजना झाली सुरू, आमदार आशुतोष काळेंनी शब्द पाळला

कोपरगाव ः अहमदनगर गेल्या विधानसभा निवडणुकीत, सहा वर्षांपासून बंद असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याचे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते. ते आज पूर्ण झाले. त्यांच्या पुढाकारातून ही योजना सुरू झाली.

गोदावरी कालव्याचे पाणी धोंडेवाडीच्या तलावात साठले. दुष्काळी टापूतील लाभधारक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आमदार काळे यांनी या तलावातील पाण्याचे पूजन केले. 

गोदावरी कालव्यातून वाहणारे पाणी उपसा योजनेद्वारे रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहाद्दरापूर व मनेगाव परिसरातील तलावांत साठवायचे, असे या योजनेचे स्वरूप आहे. माजी आमदार अशोक काळे यांनी पुढाकार घेऊन पंधरा वर्षांपूर्वी ही योजना कार्यान्वित केली. त्यामुळे बारा महिने टॅंकरच्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला. या योजनेचे वीजबिल भरण्याची जबाबदारी माजी आमदार काळे यांनी स्वीकारली होती. पावसाव्यतिरिक्त पाण्याची उपलब्धता होण्याचा अन्य कुठलाही स्रोत या भागात नाही. त्यामुळे ही योजना महत्त्वाची ठरली. 
सहा वर्षांपूर्वी ही योजना बंद पडली. देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. पाणी मिळत नसल्याने तलाव कोरडे पडले. मागील विधानसभा निवडणुकीत ही बंद योजना प्रचाराचा मुद्दा झाली. योजना पुन्हा सुरू करू, या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते. ते पूर्ण झाले आणि तलावात पाणी साठायला सुरवात झाली. 
या वेळी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, सरपंच बाबूराव थोरात, रोहिदास होन, किसन पाडेकर, के. डी. खालकर, ऍड. योगेश खालकर आदी उपस्थित होते. 


जिरायत भागासाठी ही उजनी चारी उपसा योजना महत्त्वाची आहे. बंद पडलेली ही योजना सुरू करून आपण वचनपूर्ती केली. तलावात साठलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच खरी आपल्या कामाची पावती आहे, असे मी समजतो. या योजनेसाठी सलग चोवीस तास वीज उपलब्ध व्हावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. 
- आमदार आशुतोष काळे 
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com