esakal | महाप्रचंड वेग धारण कर, ताईला चटका दे म्हणणाऱ्या चाचांचा वडापाव प्रशासनाने केला बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Vadapav Center in Samanapur closed for eight days

तालुक्यात प्रसिध्द असलेला हा वडा-पाव संगमनेरकर खवय्यांच्या, कुटूंबाचा खास आवडीचा. गरमागरम वडापाव तेही 120च्या इस्पिडनं देणारे साधेसुधे वाटणारे दुकानमालक अन्सारभाई हे वेगळचं रसायन आहे.

महाप्रचंड वेग धारण कर, ताईला चटका दे म्हणणाऱ्या चाचांचा वडापाव प्रशासनाने केला बंद

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील सेल्समनशिपमुळं त्यांचा वडा महाराष्ट्रात फेमस झाला आहे. अफाट कष्ट, प्रामाणीकपणा, जिद्द आणी ग्राहकाला परमेश्वर मानण्याची वृत्ती असलेले गोड तोंड या भांडवलावर अक्षरशः शून्यातून श्रीमंत झालेले व्यक्तिमत्व म्हणजे अन्सारभाई इनामदार.

कोल्हार घोटी राज्यमार्गावरील समनापूर हा गाव दोन गोष्टींमुळे प्रसिध्द आहे. त्याही विरुध्द टोकाच्या एक म्हणजे समनापूरचा गणपती आणी अन्सारभाईचा पाववडा. समनापूर गावातील राज्यमार्गाच्या कडेला असलेली वाहनांची गर्दी, गरमागरम वडे पावांचा आसमंतात दरवळणारा सुगंध, ग्राहकांची रांग यामुळं अनोळखी प्रवाशीही या ठिकाणी रेंगाळतोच.

तालुक्यात प्रसिध्द असलेला हा वडा-पाव संगमनेरकर खवय्यांच्या, कुटूंबाचा खास आवडीचा. गरमागरम वडापाव तेही 120च्या इस्पिडनं देणारे साधेसुधे वाटणारे दुकानमालक अन्सारभाई हे वेगळचं रसायन आहे. त्यांच्या तोंडातली रसवंती म्हणजे लाजवाबच. कितीही संतापलेल्या ग्राहकाला ते लीलया थंड करतात.

ए साहेबांना चार पार्सल दे रे प्यार से... 120 च्या इस्पिडने... महाप्रचंड वेगात. कधी शुध्द मराठी तर कधी मराठीचा तडका दिलेलं हिंदी वाक्य. दोन पाव टाकू साहेब सबसिडीत.. या वाक्याने कोणाच्याही चेहऱ्यावर अस्फूट हास्य फुटतंच. आक्काला देरे लवकर ती आठ महिन्यांपासून रांगेत उभी आहे... आणी हे सारं अखंड बोलताना तितक्याच सराईतपणे वडापाव देणारे, बिनचूक पैशांची देवण-घेवाण करण्याचं त्यांच कौशल्य पाहून समोरचा आश्चर्यचकित होतो.

दोन्ही हात जोडून प्यारसे माईबाप.. अशी आर्जवयुक्त विनवणी असो की खाता की नेता... अशी विचारणा असो सारंच अफलातून. मात्र, हे सारं करताना मदत करणाऱ्या मुलाला उद्देशून गिऱ्हाईकाच्या जिवावरच आपुण माकडासारख्या उड्या मारतो भाऊ... हा विनम्र भावही असतो.

एका छोट्या वडापावच्या गाडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज त्यांना खऱ्या अर्थाने श्रीमंत करून गेलाय. जागा, बंगला गाड्या झाल्यात. नशीब हे नावही त्यांना धार्जिण झालंय. त्यांच्या या अनोख्या मार्केटींगच्या कौशल्यामुळे अवघी दुसऱी शिकलेले अन्सारभाई चक्क महाविद्यालयातील मुलांना मार्केटींगची कौशल्ये गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवतात.

मध्यंतरी कोरोनाच्या काळात बंद असलेल्या त्यांच्या व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली असतानाच, पुन्हा दुसऱ्या लाटेत तालुक्यात कडक निर्बंध लादले गेले. सोमवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुकानात 50 पेक्षा अधिक ग्राहक, सॅनिटायझर, मास्क नसणे व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यामुळे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, विस्तार अधिकारी राजेश ठाकूर, राजेंद्र कासार, सुनील माळी, ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांच्या पथकाने या दुकानावर कारवाई करून सात दिवसांसाठी सील केले आहे.

loading image