इथे अंत्यविधीचे सर्व साहित्य मिळेल...शिर्डीतील या दुकानामुळे झालंय असं

सतीश वैजापूरकर
Saturday, 18 July 2020

अंत्यसंस्कारासाठी आवश्‍यक असलेले सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळावे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैकुंठ यात्रा साहित्य पुरविणारी सहकारी संस्था तीन वर्षापूर्वी सुरू केली.

शिर्डी : प्रत्येक धर्मात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत धार्मिक संस्कार असतात. काही गोष्टी समाजाच्या दृष्टीने तिरस्काराच्या, दुःखाच्या असल्या तरी ते संस्कार करावेच लागतात. अंत्यविधीचा प्रकारही तोच. बहुतेक धर्मात मृताला नवे कपडे घातले जातात. त्यासाठी सरपणही लागते, रॉकेलचीही आवश्यकता भासते. मीठही मागविले जाते. नेमके हे खरेदी करायचे कुठे आणि कोणी असा अनेकदा प्रसंग उभा राहतो. दुःखाच्या प्रसंगात हे काम करताना धावपळ उडते.

अंत्यसंस्कारासाठी आवश्‍यक असलेले सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळावे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैकुंठ यात्रा साहित्य पुरविणारी सहकारी संस्था तीन वर्षापूर्वी सुरू केली. लॉकडाऊनच्या काळात चार महिन्यात सायंकाळी बाजारपेठ बंद असताना या संस्थेचे सेवेमुळे तीसहून अधिक अंत्यविधी सुलभपणे करता आले.

याबाबत माहिती देताना तुपे म्हणाले, सध्या दररोज पाच वाजता बाजारपेठ बंद होते. अशावेळी सायंकाळी अंत्यविधी करण्याची वेळ आली तर दुकाने बंद असल्याने त्या कुटुंबीयांतील सदस्यांची धावपळ उडते. मात्र या सहकारी संस्थेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सरपणापासून ते अन्य सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळते.

वीरभद्र देवस्थानचा वैकुंठरथदेखील उपलब्ध असतो. त्यामुळे कमीतकमी वेळात अंत्यविधीची तयारी करता येते. शहरालगतच्या वाड्यावस्त्या व जवळच्या गावात अंत्यविधीसाठी गरज असेल तर आम्ही हे सर्व साहित्य येथून पाठवून देतो. वर्षाकाठी एक ते सव्वा लाख रुपयांची उलाढाल या संस्थेच्या माध्यमातून होते. 

हेही वाचा : गटविकास अधिकाऱ्यांनी गिळलेली लाचेतील ‘ती’ नोट गेली कोणीकडे
गरजू किंवा अनाथ व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा खर्च संस्थेच्या माध्यमातून केला जातो. वेळप्रसंगी दाते त्यासाठीचा खर्चदेखील देतात. चार महिन्यात लॉकडाऊनच्या काळात सायंकाळच्या तीस अंत्यविधीसाठी साहित्य पुरविण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. त्यामुळे संबंधितांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली.

वीरभद्र देवस्थानच्या वैकुंठरथ सेवेसाठी गंगा बनकर यांचे सहकार्य लाभते. संस्थेच्या वतीने छोट्या दशक्रिया विधीसाठी सेवा पुरविण्यास आम्ही सुरवात केली आहे. त्यासही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaikuntha Yatra society helps 30 people for cremation in Shirdi