सोळा वर्षांपासून अंथरूणाला खिळलेल्या श्रीगोंद्याच्या व्हॅलेंटाईनची कहाणी

Valentine's love story in Shrigonda
Valentine's love story in Shrigonda

श्रीगोंदे : गेली सोळा वर्षे "ते' अर्धांगवायूची सोबत घेऊन जगत आहेत. त्यातील दहा वर्षे घराच्या बाहेरही पडलेले नाहीत. सोळा वर्षांपूर्वी त्यांना "काही तासांचे सोबती' असे सांगत डॉक्‍टरांनी घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, पत्नी आणि मुलगी त्यांना जगण्याची प्रबळ इच्छा देत, आजारपणाला पळवून लावत आहेत. आरोग्य विभागात नोकरी होती ती गेली; मात्र "पत्नी सर्व काही होती म्हणून जगलो' असे ते सांगतात.

"तुझ्या- माझ्या संसाराला आणिक काय हवं,' असे पत्नीकडे पाहत म्हणणारे श्रीगोंद्यातील ज्ञानदेव कांडेकर यांची ही व्यथा आणि कथा आहे. 

कांडेकर, पत्नी ज्योती आणि मुलगी जान्हवी, असे छोटेखानी कुटुंब संत शेख महंमद महाराज मंदिरालगत राहतात. ज्ञानदेव कांडेकर काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला होते. त्या वेळी त्यांनी सुमारे पाचशे लोकांना घरी जाऊन औषधे देत मधुमेहातून बाहेर काढले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने 2005मध्ये उपकेंद्राला अचानक भेट दिली, त्या वेळी कांडेकर यांनी त्यांना दाखविलेले विषाणू आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या प्रयोगाने पथकही अचंबित झाले होते. त्याच वेळी त्यांना चांगल्या कामासाठी संघटनेने प्रशस्तिपत्र देत गौरविले होते. त्यानंतर काहीच दिवसात कांडेकर यांना अर्धांगवायूचा झटका झाला.

चालता येत नव्हते तरीही काठीचा आधार घेत काष्टीत त्यांनी लोकांची सेवा सुरू ठेवली. त्या वेळी पत्नी ज्योती यांनी त्यांना खरा आधार दिला. ज्योती या संगणक अभियंता आहेत; मात्र पतीच्या देखरेखीसाठी त्यांनी कोर्स केला. त्यात निपुणता आली. ज्ञानदेव यांनी 2010 मध्ये नोकरीला रामराम ठोकला. त्यांची मुलगी जान्हवी सध्या स्पर्धा परीक्षा देत असून, ज्योती यांनी पतीची केलेली सेवा मनाला भावणारी आहे. 

"ती' होती म्हणून मी जगलो, असे सांगत ज्ञानदेव कांडेकर म्हणाले, ""घराच्या गॅलरीत ऑक्‍सिजन झोन तयार करीत औषधी वनस्पती लावल्या आहेत. त्यात दिवसातील काही तास घालवितो.'' 

ज्योती म्हणाल्या, ""डॉक्‍टरांनी ते काही तासच जगतील; घरी घेऊन जा, असे सांगितले. मात्र, आज व्हील चेअरवर असले, तरी आनंदी जीवन जगत आहेत. वयाच्या 52व्या वर्षीही पुन्हा एकदा धावणार आणि नोकरीला जाणार, असे वारंवार बोलून दाखवितात. मुलीला प्रशासकीय अधिकारी म्हणून पाहायचेय. पुढच्याही जन्मी हे कुटुंब मिळावे, हीच प्रार्थना करते.'' 

त्यांनी शिकविले, जगावे कसे! 

जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पत्नी व मुलीचा खरा आधार, यामुळे मृत्यूलाही पळवून लावणाऱ्या या कांडेकर कुटुंबाने, कसे जगावे हेच दाखवून दिले आहे. पतीची अवस्था पाहून सहा महिने पत्नीला विस्मरण झाले होते. एकाच खोलीत दोन कॉटवर उपचार घेणारे आई-वडील पाहून दहा वर्षांची चिमुकली- जान्हवीच्या डोळ्यात अंधकार होता. मात्र, या पती-पत्नीचे जबरदस्त इच्छाशक्तीला जागृत करीत, "तुझ्यासाठी काही पण' हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com