कोरोनाचा कहर ः शिर्डीजवळील गावात सात दिवस लॉकडाउन

Village near Shirdi fortnight lockdown
Village near Shirdi fortnight lockdown

शिर्डी ः शहरालगत असलेल्या पिंपळवाडी गावात कोरोनाने उच्छाद मांडल्यानंतर 15 दिवसांनंतर सरकारी यंत्रणेला आज जाग आली.

कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि प्राथमिक लक्षणे जाणवत असलेल्या पन्नास जणांची उद्या राहाता व पुणतांबे ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्ण आढळलेल्या भागात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. लॉकडाउनचा कालावधी तीनऐवजी सात दिवसांपर्यंत वाढविण्यात आला. 

गेल्या पंधरा दिवसांत या गावात कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत होते. सरकारी यंत्रणेने तत्परतेने हालचाल करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या कोविड चाचण्या करायला हव्या होत्या.

वेळीच विलगीकरणाला प्राधान्य दिले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती, अशी भावना येथील जाणकार ग्रामस्थांनी व्यक्त केली. लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहता, खासगी दवाखान्यात उपचार घेतले.

परिस्थितीचे गांभीर्य सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही. रुग्णसंख्या आटोक्‍यात येईनाशी झाल्यानंतर कालपासून गाव लॉकडाउन करण्यात आले. मात्र, तरीही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्यात आल्या नाहीत, हे विशेष म्हणावे लागेल. 

"सकाळ'ने या गावातील परिस्थितीकडे लक्ष वेधल्यानंतर, आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के व गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी या गावात भेट दिली. गावात घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात, 85 जणांच्या कोविड चाचण्या कराव्या लागतील, अशी माहिती समोर आली.

रॅपिड अँटिजेन किट शिल्लक नाहीत. उद्या पन्नास जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या राहाता व पुणतांबे येथील ग्रामीण रुग्णालयात केल्या जातील. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर, संसर्गाचा फैलाव नेमका किती झाला हे कळण्यास मदत होईल. 

शिर्डीलाही धोका 

कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असलेले पिंपळवाडी हे गाव शिर्डीच्या पूर्व सीमेवर आहे. त्याच वेळी दक्षिणेला खेटून असलेल्या निघोज गावातदेखील कोविडचे पाच रुग्ण आहेत, अशी माहिती आज सरकारी यंत्रणेला मिळाली. पिंपळवाडीपाठोपाठ निघोज येथेही सर्वेक्षण सुरू करायचे का, यावर विचारविनिमय सुरू आहे. या दोन्ही गावांचा शिर्डीसोबत नित्य संपर्क असल्याने चिंता वाढली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com