Ahmednagar : नगरकरांच्या नळाला बसणार मीटर; मोजूनमापूनच पिण्याचे पाणी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water meter ahmednagar Amrit 2 Yojana central govt water conservation

Ahmednagar : नगरकरांच्या नळाला बसणार मीटर; मोजूनमापूनच पिण्याचे पाणी मिळणार

- अरुण नवथर

अहमदनगर : दर वर्षी दीड हजार रुपयांची घरगुती पाणीपट्टी भरणाऱ्या नगरकरांना आता मोजूनमापूनच पिण्याचे पाणी मिळणार आहे. शहरातील तब्बल ८० हजार घरांतील नळांना मीटर बसविण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. केंद्राच्या अमृत-२ योजनेंतर्गत ही मीटर बसणार आहेत.

केंद्र शासनाची १४० कोटी रुपयांची अमृत पाणीयोजना पूर्णत्वास आली आहे. मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंतची ही पाण्याची सुधारित पाइपलाइन पूर्ण झाली आहे. चार दिवसांपूर्वीच या योजनेचे पाणी वसंत टेकडी येथील पिण्याच्या टाकीत पडले. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी त्याची पाहणीदेखील केली. अमृत योजनेमुळे नगरकरांना पूर्ण वेळ आणि पूर्ण दाबाने पाणी मिळणार, असा दावा प्रशासन करत आहे. त्याचबरोबर, नगरकरांना यापुढे मोजूनमापूनच पाणी देण्याचे नियोजनदेखील प्रशासन करत आहे. त्यासाठी केंद्राच्या अमृत-२ योजनेंतर्गत तब्बल ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

या नवीन योजनेंतर्गत नगरमधील ८० हजार घरांमधील नळांना मीटर बसविली जाणार आहेत. हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. सध्या नगरकर घरगुती नळजोडणीसाठी दर वर्षी दीड हजार रुपये पाणीपट्टी महापालिकेला देतात. मात्र, नळांना मीटर बसल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तशी माहिती काही ज्येष्ठ नगरसेवकांनी दिली आहे.

आकडे बोलतात

  • शहरातील मालमत्ता - १ लाख २० हजार

  • अधिकृत नळजोड - ६२ हजार

  • नियोजित मीटरची संख्या- ८० हजार

  • सध्याची घरगुती पाणीपट्टी- दीड हजार

भविष्यातील पाणीटंचाईचा विचार आणि सध्या होत असलेली पाण्याची नासाडी, याचा विचार करूनच नळजोडांना मीटर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ‘अमृत’चे काम पूर्ण झाले आहे, नगरकरांना पूर्ण वेळ आणि पूर्ण दाबाने पाणी मिळावे, असे नियोजन करण्यात आलेले आहे.

- रोहिणी शेंडगे, महापौर

टॅग्स :Ahmednagarwater