पाणी द्या पाणी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी द्या पाणी !

पाणी द्या पाणी !

अहमदनगर, ता. १८ ः महापौर, महिला व बालकल्याणचे सभापतिपद असल्याने प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांच्या आशा विकासकामांबाबत पल्लवित झाल्या आहेत. कामे सुरू आहेत, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असले, तरी अनेक समस्यांनी हा प्रभाग ग्रासला आहे. उघडी गटारे, डासांचा उपद्रव, आरोग्याचे प्रश्न आता नागरिकांच्या अंगवळणी पडले आहेत. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा. ‘पाणी द्या पाणी’ ही एकच ओरड करताना नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे.

प्रभाग आठमध्ये दातरंगे मळा, वारुळाचा मारुती, बागरोजा हडको, जाधव मळा, बागडे मळा, सुडके मळा, बोरुडे मळा, गांधीनगर हा परिसर येतो. बहुतेक ठिकाणी आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. दातरंगे मळा परिसरात पावसाळ्यात राहावे की नाही, असाच प्रश्न उद्‌भवतो. शहराचे आलेले पाणी ओलांडताना दमछाक होते. वारुळाचा मारुती भागातील नागरिक डासांनी त्रस्त आहेत. जाधव, सुडके, दातरंगे, बोरुडे या आडनावांच्या मळ्यांत नावाप्रमाणे हे मळेच राहिले आहेत. ते शहर कधी होतील, याचीच प्रतीक्षा आहे. गंधीनगर परिसरात महापालिकेच्या वतीने नागरिकांना किमान जगण्यासाठी सुविधा हव्या आहेत.

झालेली कामे

 1. वारुळाचा मारुती परिसरात ड्रेनेज

 2. बागडे मळा, जाधव मळ्यात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण

 3. कल्याण रस्ता परिसरात रस्त्यांची कामे सुरू

 4. कल्याण रस्त्यावरील बहुतेक रस्त्यांच्या बाजूंनी ड्रेनेज पूर्ण

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

प्रस्तावित कामे

 • कल्याण रस्ता भागातील नागरिकांना रोज किंवा दिवसाआड पाणी देण्याची योजना

 • ड्रेनेजची अपूर्ण कामे- रस्ता डांबरीकरणाची अपूर्ण कामे

 • लहान मुलांसाठी स्वतंत्र बगीचा

 • ओपन स्पेसमध्ये विकास

 • डी. पी. रोड विकसित करणे

 • सीनावरील पुलासाठी पाठपुरावा

 • आदर्शनगर ते धन्वंतरी उद्यानापर्यंत रस्तादुरुस्ती

 • ओपन जिमचा प्रस्ताव

"प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार केला आहे. लवकरच पिण्याचे मुबलक पाणी, खड्डेमुक्त रस्ते, अंतर्गत गटारे होतील. निधी उपलब्ध होईल तशी कामे मार्गी लागतील."

- रोहिणी शेंडगे, महापौर

"प्रभागात दोन महत्त्वाची पदे मिळाली आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. महत्त्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिला-मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर विशेष काम करीत आहोत."

- पुष्पा बोरुडे, सभापती, महिला व बालकल्याण

"आदर्श प्रभाग बनविण्यासाठी आम्ही चारही नगरसेवक प्रयत्न करीत आहोत. रस्त्यांची, गटारांची कामे सुरू आहेत. लवकरच ती पूर्ण होतील. मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे."

- श्‍याम नळकांडे, नगरसेवक

"कल्याण रस्ता भागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मी आंदोलने केली. सध्या संपवेलचे काम सुरू आहे. जानेवारीपर्यंत हा प्रश्न बराचसा मार्गी लावणार."

- सचिन शिंदे, नगरसेवक

"आदर्शनगर गृहनिर्माण संस्था १९८५ मध्ये स्थापन झालेली आहे. येथे बारा दिवसांनंतर पाणी येते. जवळ असलेल्या बागेत सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो. ही समस्या कधी मिटणार."

- बबन खामकर, नागरिक

loading image
go to top