संगमनेर तालुक्यातील धरणाबाबत नाशिक जलसंपदा विभागाने केली ‘ही’ घोषणा

आनंद गायकवाड
Monday, 17 August 2020

संगमनेर तालुक्यातील निमोण, तळेगाव तसेच सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरलेले म्हळुंगी नदीवरील भोजापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण, तळेगाव तसेच सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरलेले म्हळुंगी नदीवरील भोजापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. अशी अधिकृत घोषणा नाशिकच्या जलसंपदा विभागाने केली आहे. आजमितीस या धरणांमध्ये सुमारे 483 दशलक्ष घनफूट या पूर्ण साठवण क्षमते इतका पाणीसाठा झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 361 दशलक्ष घनफुट इतका आहे.

भोजापुर धरणाचे एकूण लाभक्षेत्र मुळ मंजूर दोन हजार 905 हेक्टर व कालवा नुतनीकरणानंतरचे सुमारे पाच हजार हेक्‍टर इतके असून, सिन्नर तालुक्यातील १६ व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील पाच गावातील लाभक्षेत्रास या धरणाचा फायदा होतो. तसेच या धरणांमधून सिन्नर व संगमनेर तालुक्यातील अंदाजे 20 ते 22 गावांना पाणी पुरवठा योजनांद्वारे व प्रवाही पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जातो. 

संगमनेर तालुक्यातील कायम स्वरुपी दुष्काळी परिस्थिती असलेल्या निमोण तळेगाव परिसरातील कोणत्याही धरणाच्या लाभक्षेत्रात नसणाऱ्या सुमारे 15 गावांमधील शेततळे, दगडी व काँक्रीट बंधारे, लघु पाटबंधारे तलाव भरण्यासाठी डाव्या कालव्याच्या अंतिम भागापासुन सुमारे 16 किलोमीटर लांबीची व 40 क्युसेक्स विसर्ग वहन क्षमतेची भोजापूर पुरचारी 10 वर्षांपूर्वी खोदण्यात आलेली आहे. मात्र भोजापूर धरण बऱ्याच वेळा ओव्हरफ्लो होऊन देखील तळेगाव दिघे पर्यंत ओव्हर फ्लोचे पाणी पोचू शकले नाही. 

भोजापूर धरणाच्या डाव्या कालव्याचे नूतनीकरण झाले असले तरी, कालवा आणि वितरकांवरील बांधकामे अजूनही पूर्वीचीच व नादुरुस्त अवस्थेत असल्याने कालव्यामधुन शासनाकडून सुप्रमा प्राप्त नुतनीकरण प्रस्तावामधील मंजूर असलेला 215 क्युसेक्स इतका विसर्ग पुर्णवहन क्षमतेने वाहु शकत नाही. तसेच भोजापुर पुरचारीचा गाभा भरावा मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. 

भोजापुर धरणामधून जलसंपदा विभागाने वेळोवेळी उपसासिंचन योजना व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी सुमारे शंभर ते सव्वाशे दशलक्ष घनफूट इतके पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलण्यास परवानगी दिलेली असल्याने, भोजापूर धरणाच्या मूळ पाणीसाठ्यात सुमारे सव्वाशे दशलक्ष घनफूट पाण्याची तुट निर्माण झालेली आहे. यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील प्रवाही सिंचनामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. 

प्रकल्पाच्या धरणस्थळी मंजूर वॉटर प्लॅनिंग नुसार अजूनही सुमारे 200 दशलक्ष घनफूट इतके पाणी येवा ( यील्ड ) शिल्लक व उपलब्ध आहे. या अनुषंगाने धरणाच्या सांडव्याची उंची सुमारे एक ते दीड मिटरने वाढवल्यास, सिन्नर व संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना अजूनही किमान 100 दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी सहज उपलब्ध होऊ शकते. असा दावा सेवा निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Resources Department announces filling of Bhojapur dam on Mhalungi river in Sangamner taluka