नगर महापालिका सभापती निवडणुकीचा मार्ग मोकळा, नळकांडे-जाधव आघाडीवर

अमित आवारी
Thursday, 17 September 2020

स्थायी समितीच्या सभापतीला केवळ पाच महिनेच संधी मिळणार आहे. कोरोनामुळे या काळातही विशेष कामे होणार नसल्याचे बोलले जाते. या पदासाठी भाजपने प्रयत्न चालविले आहेत. शिवसेना हे पद जाऊ देणार नाही.
 

नगर ः महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम काल विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केला. त्यानुसार, पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने 25 सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीतील रिक्‍त आठ जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी निवडप्रक्रिया झाली होती. महापौर व महापालिका आयुक्‍तांनी नाशिकच्या विभागीय आयुक्‍तांकडे स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव पाठविला होता.

राज्यातील सहा-सात महापालिकांतील विविध समित्यांची सभापतिपदे रिक्‍त झाली होती. त्या-त्या महापालिकांनीही या पदांसाठी निवडणुकीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने मंजुरी देताच, विभागीय आयुक्‍तांनी नगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता सभा बोलाविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. 

महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या सहकार्याने बसपचे मुदस्सर शेख स्थायी समितीचे सभापती आहेत. त्यांना एक वर्षांसाठीच हे पद दिले होते. मात्र, चिठ्ठी टाकून स्थायी समितीचे सदस्य निवृत्त करण्याच्या प्रक्रियेत त्यांचे नाव आले नाही. त्यानंतर कोरोना संकटामुळे लॉकडाउन झाले. निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड दोन महिन्यांपूर्वी झाली. तेव्हापासून सभापतिपदाच्या निवडणुकीची मागणी होत होती. 

स्थायी समितीच्या सभापतीला केवळ पाच महिनेच संधी मिळणार आहे. कोरोनामुळे या काळातही विशेष कामे होणार नसल्याचे बोलले जाते. या पदासाठी भाजपने प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या मनोज कोतकर यांना हे पद मिळेल, असे बोलले जाते. मात्र, राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीकरण जुळल्याने त्याचा परिणामही होण्याची दाट शक्‍यता आहे. असे झाल्यास कॉंग्रेसच्या सुप्रिया जाधव अथवा शिवसेनेचे श्‍याम नळकांडे यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे आता आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेवर स्थायी समिती सभापती ठरणार आहे. स्थायी समितीत पाच शिवसेनेचे, पाच राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचा एक. बसपाचा एक, भाजपाचे चार सदस्य आहेत. परंतु हे काँग्रेसच्या सदस्या सुप्रिया जाधव यांचे पती अॅड. धनंजय हे भाजपात गेले आहेत. त्यामुळे नळकांडे यांच्या नावाचीच चर्चा अधिक आहे. सर्वांसोबत असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध कामी येऊ शकतात.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The way for the election of Speaker is clear, Nalkande, Jadhav is in the lead