esakal | सचिन वाझे-बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूसबाबत जातेगाव घाटात नेमकं काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

Khwaja Yunus fled through Jategaon Ghat in Parner

ख्वाजा पळून गेल्याबाबत पारनेर पोलिसांत नोंद करण्यात आली होती. बॉम्बस्फोटातील आरोपी बेडीसह पळाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

सचिन वाझे-बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूसबाबत जातेगाव घाटात नेमकं काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः मुंबई क्राईम ब्रँचमधील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोप केले जात आहेत. जिलेटिन असलेले वाहन वाझे वापरीत असल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने वाझे पुन्हा चर्चेत आहे. वाझे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून राज्याच्या पोलिस दलात परिचित आहेत. तब्बल ६३ गुन्हेगारांचा एन्काउंटर केल्याचे रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. मुंबईतील गुन्हेगारी संपवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु त्यांना ख्वाजा युनूस प्रकरणी घरी बसावं लागलं होतं. ते नुकतेच पोलिस दलात आले होते. पुन्हा त्यांच्याभोवती वादाचे मोहळ उठलंय.

हिरेन यांची हत्या मुंबईत झाली असली तरी ख्वाजा युनूस प्रकरण नगर जिल्ह्यात घडलं होतं. त्यांना ज्या ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित व्हावं लागलं, ते प्रकरण नेमकं काय आहे? या घटनेला एकोणीस वर्षे लोटली आहेत. परंतु वाझे यांच्यामुळे त्या प्रकरणाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.  

मुंबईतील घाटकोपर येथे डिसेंबर २००२मध्ये बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेने मुंबईसह देशही हादरून गेला होता. पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. या प्रकरणात ख्वाजा युनूस याला अटक झाली. ख्वाजा हा मूळ परभणी जिल्ह्यातील होता. इंजिनिअर असलेला ख्वाजा दुबईत नोकरीला होता. मात्र, बॉम्बस्फोटात त्याचे नाव येताच त्याला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी अटक केली.

ख्वाजा जातेगाव घाटातून पळाला

जानेवारी २००३मध्ये त्याला अधिक तपासासाठी औरंगाबाद येथे पोलिस वाहनातून नेले जात होते. पुणे-औरंगाबाद मार्गावर नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात जातेगाव घाट आहे. ख्वाजा घेऊन जाणारी ती गाडी घाटात आल्यानंतर उलटली. समोरून येणाऱ्या वाहनाच्या डिप्परमुळे पोलिस वाहनाचा ड्रायव्हर गोंधळला. त्यामुळे पोलिसांचे वाहन रस्त्याकडेला जाऊन उलटले. यात वाहनातील अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. या अपघाताचा फायदा घेऊन ख्वाजा पळून बेडीसह पळून गेला.

हेही वाचा - उद्योजक हिरण हत्याप्रकरणी पोलिसांकडे सबळ पुरावे

ख्वाजा पळून गेल्याबाबत पारनेर पोलिसांत नोंद करण्यात आली होती. बॉम्बस्फोटातील आरोपी बेडीसह पळाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. तपासात काही महिलांनी तो नगर तालुक्यातील खातगाव शिवारात पाहिल्याचं सांगितलं. त्यामुळे शेतशिवारासह सर्वत्र सर्च मोहीम राबविण्यात आली. परंतु ख्वाजा त्यावेळी काही सापडला नाही. अद्यापि तो पोलिस दप्तरी फरार आहे. ते प्रकरणही न्यायालयात आहे.

सचिन वाझेंवर आरोप

ख्वाजाला मारून टाकण्यात आलं आहे. त्या घटनेपासून वाचण्यासाठीच अपघात आणि तो पळून गेल्याचा बनाव करण्यात आल्याचा त्याच्या आई-वडिलांचा आरोप होता. या प्रकरणात पुढे २००४मध्ये वाझे यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून वाझे पोलिस दलातून बाहेर होते. नुकतेच ते क्राईम ब्रँचमध्ये दाखल झाले. पुढे ख्वाजाचे काय झाले हे पोलिसांनाच माहिती. मात्र, ते प्रकरण वाझे यांची पाठ सोडायला तयार नाही. आता हिरेन प्रकरणाने वाझे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

loading image