पोलिस सरकारच्या दावणीला; चित्रा वाघ

गुन्हेगारी फोफावली, महिलांवरील अत्याचार वाढले
Chitra Wagh
Chitra Waghsakal

नगर : ‘‘सरकारचा पोलिसांवर वचक राहिला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेंड्याचे कातडे पांघरून सरकार झोपले आहे. दिवसाढवळ्या मुलींवर अत्याचार होतात. गुन्हेगाराला तत्काळ अटक होत नाही. पोलिस यंत्रणा काय करते? ही यंत्रणा राज्य सरकारच्या दावणीला बांधली आहे,’’ असा आरोप भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ यांनी केला.

जवळा (ता. पारनेर) येथील अत्याचारित व मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना आज वाघ यांनी भेट दिली. संबंधित कुटुंबाला भाजपच्या वतीने एक लाखाचा धनादेश वाघ यांनी दिला. नगरमध्ये येऊन त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. या घटनेचा तपास तातडीने करावा, तसेच महिलांवरील अन्यायाची दखल न घेणाऱ्या पारनेरच्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, महिला आघाडीच्या अंजली वल्लाकट्टी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या, ‘‘आज संबंधित पीडित कुटुंबाला भेट दिल्यानंतर निःशब्द झाले. काय बोलावे, कशा शब्दांत त्यांचे सांत्वन करावे, हे समजेना. ती मुलगी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गेली. दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. रोजच कुठे ना कुठे असे घडत आहे. सरकार मात्र सेलिब्रिटींच्या मुलांच्या अटकेबाबत चर्चा करीत आहे. त्याचा ऊहापोह केला जातो. गरिबांच्या मुली, बहिणींची अब्रू वेशीला टांगली जाते, याचे सरकारला काहीच देणे-घेणे नाही. मुलींना काय कोंडून ठेवायचे का, हे सरकारने एकदाचे सांगावे. तोंडोळी येथेही महिलांवर अत्याचाराची घटना घडली. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री औरंगाबादला एका कार्यक्रमाला गेले; परंतु संबंधित अत्याचारित कुटुंबाची भेट त्यांनी घेतली नाही, याचे विशेष वाटते. सरकारमध्ये महिलांना ट्रोल केले जात आहे. क्रांती रेडकर प्रकरणातही तिला ट्रोल केले जात आहे. एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहे.’’

‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यास निलंबित करावे

‘‘पारनेरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. तेथील पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांना आमदार नीलेश लंके पाठीशी घालतात. त्यांचे एकत्रित फोटो आपल्याकडे आहेत. तेथील तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान कोणाचे, हे सर्वांना माहिती आहे. या तालुक्यातील दोन डॉक्टर मुलींना तेथील नेत्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे त्या नोकरी सोडून गेल्या. असे अधिकारी खाकी वर्दीवरील डाग आहेत. त्यांना तातडीने निलंबित करावे. बळप यांना संबंधितांच्या चाकरीला जाऊ द्या, अशी आमची मागणी आहे,’’ असे वाघ यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com