
या चित्ररथावर महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिकृतीबरोबरच श्री. संत निळोबा महाराज यांची प्रतिमा व त्यांच्या अभंगाच्या ओळी झळकणार आहेत.
राळेगण सिद्धी (अहमदनगर) : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी (ता.२६ जानेवारी) नवी दिल्ली येथे होणा-या राजपथावरील सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथावरून पिंपळनेर (ता.पारनेर) येथील महाराष्ट्राच्या संत परंपरेतील पाचवे स्थान असलेले संत निळोबा महाराज यांचे कार्य देशासमोर येणार आहे. या चित्ररथावर महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिकृतीबरोबरच श्री. संत निळोबा महाराज यांची प्रतिमा व त्यांच्या अभंगाच्या ओळी झळकणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या बाबतची माहिती समजताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार निलेश लंके व संत निळोबाराय ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील संत परंपरा ही या चित्र रथाची थीम आहे. यावर सुरवातीला संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा असेल. नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण फिरत्या देखाव्यावर असेल. या रथाच्या चहूबाजून महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. या संत नामदेव, संत एकनाथ, संत निळोबा महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महमंद, संत गोरोबा महाराज आदींचा समावेश आहे. या चित्र रथावर या संताच्या अभंगवाणीही साकारण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यानंतर पाचवे स्थान संत निळोबा महाराज यांचे आहे. तसेच पंढरपूर पालखी सोहळ्यात संत निळोबा महाराज यांच्या पालखीला मानाचे नववे स्थान देण्यात आले आहे. चित्ररथावर संत निळोबा महाराज यांच्या प्रतिमेखाली पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले कृपाळ या अभंगाची दोन कडवी लिहली आहेत. संत निळोबा महाराज यांनी ब्राह्मण समाजात जन्म घेऊनही त्यांनी बहुजन समाजातील संत तुकाराम महाराज यांना गुरू मानले होते. अध्यात्माबरोबरच सामाजिक सुधारणांचा संदेश देणारे संत निळोबा महाराज यांचा एक क्रांतीकारक संत म्हणून संताच्या इतिहासात नावलौकिक आहे.
पारनेर तालुका हा संत निळोबा महाराज, पराशर मुनी, सेनापती बापट व थोर समाजसेवक अण्णा हजारे अशा साधूसंताचा तालुका आहे. राजपथावरील सोहळ्याने संत निळोबा महाराजांचे कार्य देशासमोर जाणार ही बाब पारनेर तालुका व नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- अशोक सावंत, अध्यक्ष संत निळोबा महाराज ट्रस्ट, पिंपळनेर.