पंतप्रधान मोदींमुळे होणार तनपुरेच्या कामगारांचा पगार?

विलास कुलकर्णी
शनिवार, 2 मे 2020

पंतप्रधान मोदी यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेतली. प्रधानमंत्री कार्यालयातून सूत्रे हलली. आज (शनिवारी) नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना लेखी पत्र दिले.

राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराच्या एका मुलाने दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार केली. ५० महिन्यांचे वेतन थकले. उपासमार सुरू आहे. हस्तक्षेप करावा. अशी मागणी केली. त्यावर, पंतप्रधानांचे सुदर्शन चक्र फिरले. आज (शनिवारी) नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारखाना व्यवस्थापनाला तीन दिवसात सर्व थकीत वेतन अदा करुन, त्याचा अहवाल पाठवावा. असे लेखी आदेश दिले. 

हेही वाचा - नरेंद्र मोदींमुळे मिळणार तनपुरेच्या कामगारांना पगार

तनपुरे साखर कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांचा मुलगा निखिल याने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार केली. त्यात म्हंटले की, कारखान्याच्या कामगारांचे ५० महिन्यांचे वेतन थकले. अनेकदा आंदोलने करूनही, वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते. कामगारांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले.

कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीत कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आहेत. प्रधानमंत्री यांनी हस्तक्षेप करून, कामगारांना थकित वेतन मिळवून द्यावे." असे तक्रारीत म्हंटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेतली. प्रधानमंत्री कार्यालयातून सूत्रे हलली. आज (शनिवारी) नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना लेखी पत्र दिले. त्यात म्हंटले की, "निखिल कराळे यांनी वडिलांचे ५० महिन्यांचे वेतन अदा न केल्याची तक्रार पोर्टलवर केली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अतीगंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने ३१ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कायम कामगार, कंत्राटी कामगार, ट्रेनी व इतर सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण वेतन देण्याबाबत निर्देशीत केले आहे.

या शासन निर्णयानुसार आपल्या स्थापनेतील कर्मचाऱ्यांना तीन दिवसांच्या आत सर्व थकित वेतन अदा करुन, या कार्यालयास तात्काळ अहवाल पाठवावा." असे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The workers of Tanpure factory will get their salaries