इगतपुरीच्या तरुणांनी ३११ वेळा केला कळसूबाई डोंगर पार

शांताराम काळे
Wednesday, 28 October 2020

इगतपुरी तालुक्यातील (नाशिक) घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी 24 वर्षापासून नवरात्र उत्सवात कळसुबाईच्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

अकोले (अहमदनगर) : इगतपुरी तालुक्यातील (नाशिक) घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी 24 वर्षापासून नवरात्र उत्सवात कळसुबाईच्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. 24 वर्षात नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक कांरणांमुळे ही शिखरावर जात त्यांनी 311 वेळा कळसुबाईच्या शिखरावर जाण्याचा विक्रम मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी केला.

कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला असताना त्याच पार्श्वभूमीवर कळसुबाई मित्र मंडळाच्या वतीने कोरोना नावाच्या राक्षसाला ठार मारण्यासाठी कळसुबाई शिखरावर नऊ दिवस घट मांडुन रोजच कळसुबाई मातेला आराधना करून कोरोनाला ठार करण्याचे साकडे घातले. रोज नित्यनेमाने प्रार्थना केली आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीने जगावर मोठे संकट आले आहे, देशातील सर्व देवालये बंद झाली आहेत. त्यातच राज्यातील व इगतपुरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी सामाजिक अंतर ठेवून, मास्क वापरून कळसुबाई मित्रमंडळाने मनोभावे मातेला साकडे घातले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शरीराची साथ, देवीचा आशीर्वाद व सकारात्मक साथ हा त्रिवेणी संगम कायम राहिला तर हा विक्रम यापुढे ही कायम राहील. जणू काही कळसुबाई व घोटीचे ट्रेकिंगविर हे एक सुत्रच झाले आहे. गड किल्यांच्या संवर्धनाचा वसा घेवून 24 वर्षांपासून या कार्यात झोकून देणाऱ्या युवकांच्या आगळयावेगळ्या छंदाची ख्याती राज्यभर पसरली आहे. पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपनासह एकात्मतेचे संदेश देणारे हे युवक कामगिरी करीत आहेत. राज्यातील अनेक किल्ले खडतरपणे चढाई करीत आपल्या जगावेगळ्या इच्छेसाठी झटनारे युवक अनेकांना प्रेरणादायी ठरले आहेत.

1997 मध्ये घोटी (ता. इगतपुरी) येथील गड किल्यांची स्वत: चढ़ाई करुन सफरीचा आनंद घेणारे ध्येयवेडे युवक भागीरथ मराडे आणि अन्य दोघे युवक सतत सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर जात होते. यावेळी ते चढ़ाई करतांना डोंगरावर असणारी अस्वच्छता दूर करीत उपयुक्त झाडांची लागवड करायचे. यासह त्या त्या ठिकाणी काहींनी केलेले विद्रूपीकरण दूर करीत शक्य तेवढे निर्मळ करायचे. यातच भागीरथ मराडे यांचा आदर्श घेत आज जवळपास 150 ते 200 युवक या कार्यात सहभाग घेतात. 1997 सालीच ध्येयवेड्या युवकांनी कळसुबाई मित्र मंडळाची स्थापना केली. स्वखर्चाने करीत असलेल्या या उपक्रमातुन ते वृक्षारोपण करुन त्याचे जतन करतात. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth of Igatpuri crossed the Kalsubai mountain 311 times