भातोडी पारगावच्या विकासासाठी युवकाचे मंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

पारगावला 550 एकराचा ऐतिहासिक तलाव लाभला आहे. शहाजी राजे भोसले यांनी प्रथमच गनिमी कावा युद्धनितीचा वापर करून येथे लढाई जिंकली होती.

नगर तालुका ः भातोडी पारगावची (ता. नगर) नवीन उपक्रमातून आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे. गावातील युवक-युवती व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. त्यामुळे गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

गावाच्या या विकास वाटचालीत आणखी काय करता येईल या संदर्भात गावातील युवक तसेच प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. 

भातोडीमध्ये खुली जिम, तालीम, पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर ओ प्लांटची उभारणी, पाणी नळ योजना अशा अनेक उपक्रम गावात तरुणांच्या सहकार्याने ग्रामपंचायत राबवत आहे. गावात राबवत असलेल्या विविध उपक्रमाबाबत आज पारगावचे गणेश शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना माहिती दिली. 

पारगावला 550 एकराचा ऐतिहासिक तलाव लाभला आहे. शहाजी राजे भोसले यांनी प्रथमच गनिमी कावा युद्धनितीचा वापर करून येथे लढाई जिंकली होती. या तलावाच्या जवळच शरिफजी राजे भोसले यांची समाधी आहे. तलावाशेजारी ब्रिटिशांनी बांधलेले छोटेखानी रेस्ट हाऊस आहे.

तलावाच्या भिंतीचे डागडुजी, तलावाचे उत्खनन, तलावातून बाहेर पडलेल्या गाळाचा शेतकऱ्यांसाठी फायदा, गावालगतच्या बाजूनी धोबीघाट तसेच पारगाव, पारेवाडी व भातोडी या तीनही गावांना कायमस्वरूपी पाण्याचा फायदा व्हावा यासाठी काही प्रकल्प उभा करता येईल का यासंबंधी जलसंपदामंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. 

- अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Minister for development of Bhatodi Pargaon