Ahmednagar : सावकारी जाचामुळे तरुण बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

missing

Ahmednagar : सावकारी जाचामुळे तरुण बेपत्ता

Ahmednagar : राहुरी फॅक्टरी येथील एक सलून व्यावसायिक राहत्या घरातून चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. त्याच्या पत्नीने राहुरी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली आहे, परंतु खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे सावकारी भस्मासुराला रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

अप्पासाहेब विठ्ठल थोरात (वय ४५, रा. अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) असे बेपत्ता सलून व्यावसायिकाचे नाव आहे. शनिवारी (ता. २०) पहाटे चार वाजता राहत्या घरातून ते गायब झाल्याचे त्यांच्या पत्नी स्वाती यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या अंगात चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. उंची पाच फूट पाच इंच, उभट चेहरा, गोरा रंग, तरतरीत डोळे, सरळ नाक, नाकावर मस, असे त्यांचे वर्णन आहे.

त्यांची मुलगी पायल थोरात म्हणाली, की वडिलांनी खासगी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतले होते. चाळीस रुपये शेकडा अशा भरमसाट व्याजदराने सावकार वसुली करीत होते. घटनेच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. १९) दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मी आरडाओरड करून त्यांना परावृत्त केले. त्यावेळी त्यांनी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळलो आहे. लहान भावाला काही पैसे देऊन ते घरातून निघून गेले आहेत.