येथील नागरिकांनी दाखविला संयम... समन्वयातून घालवला कोरोना

amc
amc

अकोला : एकीकडे कोरोना विषाणूबाबत अकोला महानगरपालिका हद्दीतील स्थिती विस्फोटक होत असताना दुसरीकडे पाच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोरोनावर मात करून दिलासा दायक चित्र निर्माण केले आहे. नागरिकांचा संयम, प्रशासकीय समन्वय आणि पोलिसांच्या सहकार्यामुळे अकोला शहारातील पाच परिसर कोरोना मुक्त झाले आहेत. हा संयम व समन्वय शहरालाही कोरोनामुक्त करू शकतो.


सर्वत्र निराशाजनक चित्र. दिवसेंदिवस वाढत असलेली संसर्गीत रुग्णांची संख्या धडकी भरविणारी. प्रशासकीय समन्वयाचा अभाव. एका विभागाचे दुसऱ्या विभागाला मिळत नसलेले सहकार्य या सर्व पार्श्‍वभूमीवर अकोल्यात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढत आहे. या निराशाजनक वातावरणातही शहरातील पाच परिसरांनी कोरोनावर मात करीत कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्यात यश मिळविले आहे. त्यात अकोट फैलमधील शंकरनगर आणि सिंधी कॅम्प परिसर दोन मोठे परिसर होते. याशिवाय शिवणी व शिवर आणि जयहिंद चौक या परिसरातही गेले 28 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार पाचही परिसरांना कंटेन्मेंट झोनमधून बाहेर काढण्यात आले.


या उपाययोजना ठरल्या प्रभावी
कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती विस्फोटक होत असताना एखादा परिसर कोरोनावर मात करीत असेल तर निश्‍चितच दिलासादायक चित्र आहे. त्यासाठी काही गोष्टी निश्‍चितच जाणीवपूर्वक करून घेण्यात आल्यात तर नागरिकांचा संयमही तेवढचा महत्त्वाचा ठरला. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे काही धाडसी निर्णयही त्यासाठी कारणीभूत ठरलेत. त्यात प्रामुख्याने कंटेन्मेट झोनमधील नगरसेवकांसोबत मिळून कम्युनिटी क्लिनिक सुरू करणे, घरोघरी जावून प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करणे, संशयितांचे तातडीने स्वॅब घेवून त्यांना तातडीने क्वारंटाईन करणे व संचारबंदीची योग्य अंमलबजावणी करण्यासारख्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात.


नागरिकांचा संयम व पोलिसांचे सहकार्य
कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडलेल्या पाचही परिसरात नागरिकांनी संयम दाखवला. प्रशासनाला सहकार्य केले. सोबतच खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण वानखडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रमुख रामेश्‍वर चव्हाण आणि अकोट फैल पोलिस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे परिसर कोरोनावर मात करू शकलेत.


झोन अधिकाऱ्यांच्या परिश्रमाचे फळ
कंटेन्मेट झोनमधून बाहेर पडल्या परिसरातील स्थिती बघता येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणे सह शक्य नव्हते. त्यामुळे मनपा आयुक्त संयज कापडणीस यांच्या नेतृत्वात दक्षिण झोनचे अधिकारी संदीप गावंडे आणि उत्तर झोनचे अधिकारी विठ्ठल देवकते यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून घेतलेल्या परिश्रमामुळेच दिलासादायक चित्र निर्माण होऊ शकले. अकोट फैल शंकरनगरमधील 695 मालमत्तांमध्ये 3475 नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेणे व त्यांना संसर्गापासून रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्यात. इतर परिसरातही नागरिकांना संसर्गापासून रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना स्थानिक नगरसेवकांचे मिळालेले सहकार्य महत्त्वाचे ठरले.


नागरिकांच्या सहकार्यामुळेच शक्य
आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार नियमित निर्जंतुकिकरण, आरोग्य तपासणी व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे अकोट फैलमधील शंकरनगरात कोरोनावर मात करणे शक्य झाले.
- विठ्ठल देवकते, झोन अधिकारी, उत्तर झोन, मनपा

सामूहिक आरोग्य तपासणीचा लाभ
नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार स्थानिक नगरसेवक व डॉक्टरांच्या सहकार्याने घेतलेल्या सामूहिक आरोग्य तपासणी शिबिरामुळे संसर्ग टाळता आला. त्यामुळे शिवर, शिवणी, सिंधी कॅम्प परिसरात २८ दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण आढला नाही. पोलिसांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरले.
- संदीप गावंडे, झोन अधिकारी, दक्षिण झोन, मनपा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com