कोरोनाविरुद्ध लढताना शासनाला या अभियानाचा पडला विसर; स्‍वयंस्‍फूर्तीने चळवळ हातात घेण्याची वेळ

निखिल देशमुख
Wednesday, 10 June 2020

गेल्‍या तीन महिन्‍यांपासून संपूर्ण देश कोरोना विषाणूच्‍या संकटाविरोधात लढत आहे. आरोग्‍य, पोलिस, महसूल, नगरपालिका अशा सर्व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी या रोगाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर कष्ट घेत आहेत.

खामगाव (जि.बुलडाणा) : देशासह राज्‍यात आलेल्‍या कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे दरवर्षी होणारी वृक्षलागवड यावर्षी होणार नसल्‍याचे चित्र आहे. शासनाच्‍या सर्व यंत्रणा सध्याच्‍या घडीला कोरोनाशी मुकाबला करीत आहेत. त्‍यामुळे यंदाच्‍या वृक्षलागवडीचे नियोजन अद्यापही होऊ शकले नाही. त्‍यामुळे यंदा जनतेनेच पुढे येऊन स्‍वयंस्‍फूर्तीने वृक्षलागवडीची चळवळ हातात घेण्याची वेळ आली आहे.

गेल्‍या तीन महिन्‍यांपासून संपूर्ण देश कोरोना विषाणूच्‍या संकटाविरोधात लढत आहे. आरोग्‍य, पोलिस, महसूल, नगरपालिका अशा सर्व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी या रोगाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर कष्ट घेत आहेत. महाराष्ट्र या संकटाला रोखत असताना निसर्ग चक्रीवादळ, टोळधाड अशी संकटे बदलत्‍या वातावरणामुळे येत आहेत. जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या रस्‍ता कामांमुळे बेसुमार झाडांच्‍या कत्तली झाल्‍या असून, त्‍यामुळे निसर्गातील अनियमितता दिसून येत आहे.

महत्त्वाची बातमी - अहो आश्‍चर्यम! लोकमान्य टिळकांच्या आधीपासूनच या गावात साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव

कोरोनामुळे तब्‍बल तीन महिने करण्यात आलेल्‍या लॉकडाउनमुळे रस्‍त्‍यावर धावणारी वाहने, औद्योगिक कंपन्‍या बंद राहिल्‍या. त्‍यामुळे अनावधनाने का होईना पण हवा मोठ्या प्रमाणात शुध्द झाली आहे. मृग नक्षत्रास सुरुवात झाली असून, येत्‍या काही दिवसांत मॉन्‍सून देखील सक्रिय होण्याची चिन्‍हे आहेत. परंतु यंदा शासकीय यंत्रणा कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात व्‍यस्‍त असल्‍याने वनविभागाच्‍यावतीने वृक्षलागवडीचे कोणतेच नियोजन झालेले नाही. त्‍यामुळे जिल्‍ह्‍यात प्रत्‍येक व्‍यक्‍तीने या पावसाळ्यात एक झाड लावल्‍यास लाखो रोपांची लागवड होऊ शकते.

हेही वाचा - काय म्हणता ! जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग लाल? नेमके काय झाले? वाचा...

या संस्‍थांनी घ्यावा पुढाकार
मागील काही वर्षात वृक्षलागवडीची मोहिम मोठ्या उत्‍साहात राबविली जात आहे. परंतु याला यशस्‍वी करण्यासाठी शासनाला आपल्‍या स्‍तरावर प्रयत्‍न करावले लागत होते. यावर्षी परिस्‍थिती अनुकुल नसून शासकीय यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. त्‍यामुळे पर्यावरण रक्षण करणे ही आपली जबाबदारी समजून स्‍वयंसेवी संस्‍था, ग्रामपंचायत, संघटना, लोकप्रतिनिधींनी यंदाच्‍या वृक्षलागवडीची चळवळ हातात घेऊन पर्यावरणवाढीसाठी आपले योगदान देण्याची गरज आहे. 

वृक्षलागवडीचे नियोजन अजून झालेले नाही
दरवर्षी जून महिन्‍यापर्यंत वृक्ष लागवडीचे सर्व नियोजन झालेले असते. परंतु यावर्षी कोरोनाच्‍या संकटामुळे शासनास्‍तरावर यंदाच्‍या वृक्षलागवडीचे नियोजन अजून झालेले नाही. 
- संजय माळी, डीएफओ, बुलडाणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government forgot about the tree planting campaign in buldana district akola marathi news