esakal | पहिल्या पावसाने मॉन्सून पूर्व तयारीचा असा उडाला बोजवारा अन् वीज पुरवठ्याचे तर...

बोलून बातमी शोधा

rain in buldana district.jpg

शहर व तालुक्यात वादळी वारा व मुसळधार पाऊस झाला. या पावसामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक घरावरचे टीनपत्रे उडून गेले.

पहिल्या पावसाने मॉन्सून पूर्व तयारीचा असा उडाला बोजवारा अन् वीज पुरवठ्याचे तर...
sakal_logo
By
उद्धव फंगाळ

मेहकर (जि.बुलडाणा) : शहरासह तालुक्यात 31 मे ला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात व वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठ्याचे तीन-तेरा वाजले असून पहिल्याच वादळी वाऱ्यासह पावसात वीजपुरवठ्याचे भिजत घोंगडे उघड्यावर आले आहे. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बँकेसह विविध लहान-मोठे व्यवसाय ठप्प झाला असून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा समर्थ अर्बनचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश देशमुख यांनी केली आहे.

शहर व तालुक्यात वादळी वारा व मुसळधार पाऊस झाला. या पावसामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक घरावरचे टीनपत्रे उडून गेले. विजेचे खांबही अनेक ठिकाणी वाकले. विजेच्या तारा ही कोसळल्यामुळे मेहकर तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. यामुळे लहान-मोठे व्यवसाय बंद पडले आहे. टाळेबंदीमध्ये थोड्याफार प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे विविध व्यवसाय नियम अटीच्या शर्थीवर सुरू करण्यात आले आहेत.

आवश्यक वाचा - भाजपच्या ज्येष्ठ आमदारांनी दिला बच्चू कडूंना हा सल्ला

मात्र, वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेक व्यवसाय बंद पडत आहे. सध्या शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी विविध बँकेकडे धाव घेत आहे. मात्र, बँकेमधील वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्याची कामे होण्यास अडचण येत आहे अशीच परिस्थिती शहरातील विविध पतसंस्थेची सुद्धा आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने मोबाईल चार्जिंग अभावी बंद आहे. त्यामुळे अधिकारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा संपर्क होत नसल्याने याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे.

झेरॉक्स मशीन, ग्राहक सेवा केंद्र, सेतू विविध शासकीय कार्यालयातील कामे खरेदी-विक्री कार्यालयातील कामकाज विजेच्या लपंडावामुळे ठप्प झाले आहे. पहिल्याच वादळी वाऱ्यात व पावसात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड्यावर पडला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा दुरुस्तीची कोणतीच कामे केलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. विजेच्या ताराला अडचण निर्माण होणारी झाडे तोडली नाहीत. शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या विजेच्या तारा सुद्धा सुरळीत केल्या नाही. 

शहरात माळी पेठ, मिलिंद नगर, शिक्षक कॉलनी, पवनसुत नगर, गवळीपुरा आदी भागात अनेक ठिकाणी विजेच्या तारा कित्येक घरावर लोंबकळलेल्या आहे. वीज वितरण कंपनीकडे अथवा संबंधित लाईनमनकडे वेळोवेळी सदर घरावरील तारा काढण्यासाठी मागणी करूनही विजेच्या तारा जैसे थेच आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून शहर व ग्रामीण भागातील अनेक खेड्यापाड्यातील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी केवळ वेळकाढू धोरण अवलंबित असल्याने कित्येक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांची कामे सुद्धा खोळंबली आहे.

लहान-मोठे व्यवसायावर परिणाम
1 जूनपासून टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली असून, लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने याचा परिणाम लहान-मोठे व्यवसायावर होत आहे. विविध राष्ट्रीयकृत बँकेची अथवा पतसंस्थेची लहान मोठा व्यवसायकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही. त्यामुळे मेहकर शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा.
- अ‍ॅड. शैलेश देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष, मेहकर.

दुरुस्तीचे काम सुरू
वादळी वारा व पावसामुळे काही ठिकाणांचे विजेचे खांब वाकून विजेच्या तारा तुटल्या आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल.
- प्रशांत उईके, कार्यकारी अभियंता, मेहकर.