पीक कर्जासाठी टाळाटाळ केल्यास परिणाम भोगावे लागतील : रविकांत तुपकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

कृषीमालाला भाव नाही. त्यामुळे आजही कृषिमाल शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. त्यात आता पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी खते, बी-बियाणे व पेरणीच्या खर्चाची तडजोड करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

बुलडाणा : पेरणी सुरू झाली आहे मात्र अद्यापही लाखो शेतकर्‍यांना पीककर्ज मिळाले नाही. पिककर्जासाठी शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या पाहता रविकांत तुपकर यांनी तालुका निहाय कृतिशील उपक्रम हाती घेतला आहे. त्या नुसार पिककर्जाबाबत तक्रारीवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकर यांनी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह आज (ता.15) विविध बँकांमध्ये धडक देवून शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या अडचणी सोडविल्या. यापुढे पिककर्जासाठी टाळाटाळ केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना दिला.

कृषीमालाला भाव नाही. त्यामुळे आजही कृषिमाल शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. त्यात आता पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी खते, बी-बियाणे व पेरणीच्या खर्चाची तडजोड करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लाखो शेतकरी पिककर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांचे दार ठोठावत आहे. मात्र विविध कारणे सांगून बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्टॅम्प पेपर चा तुटवडा तसेच काही शेतकरी कर्जमाफी होऊन मृत झालेले आहेत त्यांच्या वारसांना पीककर्ज दिले जात नाहीये.

महत्त्वाची बातमी - जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

साइट बंद असल्याने अनेकांचे थम्ब झाले नाही याशिवाय कर्जमाफीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज अडवून धरले जात आहे. नवीन कर्जदारांनाही कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासह पिककर्जाबाबत शेतकऱ्यांच्या विविध अडचणी रविकांत तुपकर यांच्याकडे स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरमध्ये शेतकऱ्यांनी मांडल्या. शेतकऱ्यांच्या या तक्रारी पाहता रविकांत तुपकर यांनी पिककर्जाबाबत कृतिशील कार्यक्रम हाती घेतला आहे.

बुलडाण्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इंडियन ओवरसीस बँक, स्टेट बँक विभागीय व्यवस्थापक कार्यालय व देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये रविकांत तुपकरांनी भेट दिली. संबंधित व्यवस्थापकांसोबत चर्चा केली. यावेळी पोलिसांनी संबंधित बँकांमध्ये तगडा बंदोबस्त लावला होता. रविकांत तुपकारांना पिककर्जाबाबत येणार्‍या अडचणीचा पाढा वाचण्यासोबतच बँकांकडून शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या वागणुकीबाबत बँक अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

हेही वाचा - धक्कादायक : कोरोनामुक्त झालेल्या या जिल्ह्यात आता उद्रेक सुरू; तब्बल ऐवढे रुग्ण पॉझिटिव्ह

देऊळघाटच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तर श्रावण बाळ व निराधार यांच्या पैशाला होल्ड लावला होता. रविकांत तुपकारांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना सदर होल्ड ही काढायला लाऊन श्रावण बाळ व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा मिळवून दिला. यावेळी राणा चंदन, पवन देशमुख, आकाश माळोदे, दत्ता जेउघाले, गोपाल जोशी, मोहम्मद साजिद, कडूबा मोरे, मोहन मोरे यांच्यासह बुलडाणा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

सन्मानाची वागणूक द्या : रविकांत तुपकर
पिककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँक अधिकाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशाराही यावेळी रविकांत तुपकरांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना दिला. बुलडाणा तालुक्यानंतर आता ते मोताळा तालुक्यातील बँकांमध्ये धडक देऊन शेतकऱ्यांच्या पिककर्जासंबंधातील अडचणी सोडविणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swabhimani became aggressive for crop loan in buldana district akola marathi news