Video : अरेरे...शेत शिवारात झाला चक्क लाल अश्रूंचा सडा, पहा काय झाले असे...

सकाळ वृत्तसेेवा | Saturday, 30 May 2020

कोरोनाने व्यापार उद्योग बंद झाल्याचे कवित्व सगळीकडेच ऐकावयास मिळते. मात्र शहराबरोबर गावखेड्यात कोरोनामुळे बांधावरचे उसासे बेदखल होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या प्रकोपात उजाड शिवारात घामाचे लाल अश्रू ही कहाणी सांगत आहेत.

वाशीम: कोरोनाने व्यापार उद्योग बंद झाल्याचे कवित्व सगळीकडेच ऐकावयास मिळते. मात्र शहराबरोबर गावखेड्यात कोरोनामुळे बांधावरचे उसासे बेदखल होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या प्रकोपात उजाड शिवारात घामाचे लाल अश्रू ही कहाणी सांगत आहेत.

कोरोना विषाणूने सगळे विश्व उध्वस्त झाले आहे. आईला लेकरू भारी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील व्यापार उद्योग बंद झाल्याचे रकाने व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्राईम टाईम व्यापले आहेत. महानगरात कामगाराची पायपीट काळीज पिटाळून टाकत असतांना गावखेड्यात बळीराजाचे भावविश्व पणाला लागले आहे. वाशीम तालुक्यातील झाकलवाडीचे शिवार असेच लाल झाले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळं जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.

याचा सर्वात जास्त फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात ग्राहक मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकीसन काळबांडे यांना सहा एकरातील कलिंगडावर रोटावेटर फिरविण्याची दुर्दवी वेळ आली आहे. लेकरागत रक्ताचे पाणी करून पिकविलेले टरबूज डोळ्यादेखत नष्ट करतांना या शेतकर्याच्या भावना अनावर होवून डोळ्यातून वाहणारे अश्रू कोरोनाची आपबिती कथन करीत आहेत.

 

स्वप्नांचा झाला लाल चिखल
मोठ्या आशेने या शेतकऱ्याने सहा एकरावर टरबूज लागवड केली. मात्र, लाॅकडाऊनमुळे  टरबूज खरेदी करायला व्यापारीच येत नसल्याने आता खरीपाच्या पेरणीसाठी शेत तयार करणे गरजेचे असल्याने शेवटी स्वप्नाचा लाल चिखल करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. .त्यामुळंं त्यांचं 14 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, लावडीसाठी घेतलेलं कर्ज फिटणार नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. जिल्हा प्रशासनाने  संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.