आश्चर्यम्! विजेशिवाय होतोय शेतात 24 तास पाणीपुरवठा...तो कसा? वाचा

अनुप ताले
Saturday, 13 June 2020

जिल्ह्यातच नव्हे तर, संपूर्ण विदर्भात पाणी आणि विजेचा अभाव हा शेती व शेतकऱ्यांसाठी ऐरणीचा प्रश्न बनला आहे. जवळपास 85 टक्के क्षेत्र कोरडवाहू असल्याने, बहुतांश शेतकऱ्यांना पावसाच्या तसेच कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबुन राहावे लागते. त्यातही वीजेची समस्या कायम असल्याने, योग्य पाणीपुरवठ्याअभावी येथील शेती अधोगतीला असल्याचे दिसून येत आहे. मात्र अकोला जिल्ह्यात मजीप्राच्या एका सेवानिवृत्त उपविभागीय अधिकाऱ्याने या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढला असून, त्यासाठी एक अभिनव प्रकल्प त्यांनी उभारला आहे.  आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकल्पांतर्गत वीजेशिवाय, केवळ पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे शेतांमध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जात असून, आतापर्यंत 250 एकराहून अधिक शेतात या प्रयोगातून ओलित करण्यात आले आहे.  

अकोला : वीजेशिवाय चढावरच्या शेतात पाईपामधून पाणी धावेल असा कोणी विचारही केला नसेल. परंतु, हे शक्य करून दाखविले आहे मजीप्राचो सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी हरिदास ताठे यांनी. पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे तंत्रज्ञान अवलंबून व लोकसहभागातून त्यांनी अभिनव प्रकल्प उभारला असून, या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 250 एक्कर शेतीमध्ये २४ तास आणि तो ही वीजेशिवाय पाणी पुरवठा करून बारमाही ओलित करून दाखविण्याची किमया त्यांनी करुन दाखविली आहे.

 

जिल्ह्यातच नव्हे तर, संपूर्ण विदर्भात पाणी आणि विजेचा अभाव हा शेती व शेतकऱ्यांसाठी ऐरणीचा प्रश्न बनला आहे. जवळपास 85 टक्के क्षेत्र कोरडवाहू असल्याने, बहुतांश शेतकऱ्यांना पावसाच्या तसेच कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबुन राहावे लागते. त्यातही वीजेची समस्या कायम असल्याने, योग्य पाणीपुरवठ्याअभावी येथील शेती अधोगतीला असल्याचे दिसून येत आहे. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी हरिदास ताठे गेल्या 14 वर्षापासून प्रयत्नशिल आहेत. आज याच प्रयत्नांतून आणि केवळ लोकसहभागातून त्यांनी पातूर तालुक्यात मोर्णा धरणावर तसेच अकोट तालुक्यात अंबाडी येथील लघु सिंचन तलावावर अभिनव प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे अल्पदरात, विनावीज, 24 तास जवळपास 250 एक्करवर ओलित करण्यात त्यांनी उपलब्धी मिळवली आहे. अजून चारशे एक्करवर ओलित करता येईल एवढी क्षमता या प्रकल्पांची असून, राज्यभरात हा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हे ही वाचा : ऐका हो ऐका...सहकारी संस्था करणार आता कृषी निविष्ठांची विक्री

 

Image may contain: 1 person, closeup
पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या वापरातून पाणीपुरवठा
सर्व शेतीसाठी 24 तास पाणी मिळावे, विजेचा भूर्दड बसू नये, रात्री पाणी देण्याची जोखिम व त्रास टाळता यावा, पाण्याची तसेच पाणीपुरवठ्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची बचत व्हावी, याकरिता हा प्रकल्प उभारला आहे. त्यासाठी शासनाकडून कोणतीही मदत घेतली नसून, पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या उपयोगातून, लोकसहभागातून व कर्ज काढून प्रकल्पसिद्धीस आणला आहे. पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने, तणनिर्मितीवर ओपोआपच रोख लागून, परिसरातील शेतकऱ्यांना भरघोस पीक उत्पादन मिळत आहे.
- हरिदास ताठे, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

 

 

हे ही वाचा : पाऊस येईल का? सरकार कापूस घेईल का?...20 हजार शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून

 

 

Image may contain: 1 person, sunglasses and closeup
बारमाही, २४ तास मिळणार पाणी
श्री सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था यांच्या सहकार्यातून व प्रकल्प प्रमुख हरिदास ताठे यांच्या मार्गदर्शनात, मोर्णा धरणावर हा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी 20 लाख रुपये खर्च आला असून, 300 ते 400 एकरावर विनावीज, 24 तास आणि बारमाही ओलित करणे यातून शक्य होणार आहे. सध्या 51 शेतकऱ्यांना 150 एकरावर प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा होत असून, पाण्याला भरपूर फोर्स असल्याने स्प्रिंक्लर, ड्रिपवर संत्री, मोसंबी, लिंबू, पेरू, केळी, हळद अशा प्रकारे शेतकरी फळबाग करीत आहेत.
- हिम्मतराव टप्पे, अध्यक्ष, श्री सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था, कोठारी

 

हे ही वाचा : ऐका हो ऐका...शेत बांधावर लागणार आता पैशाचे झाडं

 

22 हजार हेक्टरवर मिळणार 24 तास पाणी
अंबाडी व कोठारी गावांव्यतिरिक्त वान प्रकल्पावरील 61 पाणी वापर संस्थांतर्गत 43 गावांचे 15 हजार 553 कास्तकार, चिंचपानी धरणावरील एका पाणी वापर संस्थेचे तीन गावातील 263 कास्तकार, पोपटखेड धरणावरील नरनाळा पाणी वापर संस्थेचे सहा गावातील 250 कास्तकार तर, पवनपुत्र हनुमान पाणी वापर संस्थेचे चार गावातील 229 व सातपुडा पाणी वापर संस्थेचे 11 गावातील 640 कास्तकार या उपक्रमात सहभागी झाले असून, उपक्रमांतर्गत 21 हजार 864 हेक्टरवर लवकरच विजेशिवाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे 24 तास पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे हरिदास ताठे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 hours water supply in the field without electricity