esakal | रुग्णांसाठी वरदान ठरतोय हवेतून ऑक्सिजन बनवण्याचा प्रकल्प

बोलून बातमी शोधा

रुग्णांसाठी वरदान ठरतोय हवेतून ऑक्सिजन बनवण्याचा प्रकल्प

रुग्णांसाठी वरदान ठरतोय हवेतून ऑक्सिजन बनवण्याचा प्रकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः स्थानिक औद्योगिक परिक्षेत्रात (एमआयडीसी) नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्रकल्प आहे. सदर प्रकल्प कोरोनाच्या काळात स्थानिक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वरदान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे व अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डाॅ. नीलेश अपार यांनी ऑक्सिजन प्लांटची गुरुवारी (ता. २९) पाहणी केली.

कोरोना बाधित व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देवून रुग्णांचे प्राण वाचवतात. त्यामुळे सद्या सर्वत्र कृत्रिम ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. परिमामी ऑक्सिजनचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे.

या स्थितीत स्थानिक एमआयडीसीतील माउली उद्योगाच्या नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज ५०० ते ५५० ऑक्सिजन सिलिंडर तसेच वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णांसाठी प्रत्येकी १०० असे एकूण ७०० ते ७५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या लिक्वीड ऑक्सिजनचा वापर न करता, नैसर्गिक हवेतून तयार केलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा या प्लांटमधून करण्यात येत आहे.

त्यामुळे रुग्णांसाठी वरदान ठरत असलेला सदर प्लांटची निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी पाहणी केली. यावेळी ऑक्सिजन प्लांटचे किशोर तळोकार व त्यांचा मुलगा अनिकेत तळोकार उपस्थित होते. त्यांनी आरडीसी व एसडीओंना हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.

संपादन - विवेक मेतकर