Akola Riots : अकोला दंगल प्रकरण; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यासह काहीजण ATS च्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola riots case Mumbai ATS

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री व अकोला जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले होते.

Akola Riots : अकोला दंगल प्रकरण; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यासह काहीजण ATS च्या रडारवर

अकोला : जुने शहरात एका सोशल मीडिया व्हायरल पोस्टवरून दोन समाजात ता. १३ मे रोजी रात्री झालेल्या वादात काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यासह (Congress leader) काही जण दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) रडारवर आहेत.

मुंबई एटीएसच्या (Mumbai ATS) पथकानं अकोल्यातील या घटनेची चौकशी केली असून, येत्या तीन-चार दिवसांत या संदर्भातील अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर संशयित आरोपींची धरपकड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अकोला शहरात एका विशिष्ट समाजाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करण्यात आला होता. त्यावरून जुने शहरातील हरीहरपेठ भागात दोन समाजातील युवक आमने-सामने आलेत. यात एकाचा मृत्यूही झाला होता. घरांची जाळपोळ, वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. धार्मिक स्थळांनाही नुकसान पोहोचविण्यात आलं. त्यामुळं वातावरण चांगलंच चिघळलं होतं.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री व अकोला जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले होते. त्यानुसार मुंबईच्या एटीएस पथकानं अकोल्यात नुकतीच तीन दिवस पाहणी केली. या घटनेबाबतचा तपशील जाणून घेतला. याशिवाय घटनेसाठी जबाबदार असलेल्यांबाबतही माहिती घेतल्याचं कळतं.

एटीएसचा संशय काँग्रेसच्या एका बड्या नेत्यावर असून, त्यांच्यासोबत आणखी पाच ते सहा आरोपी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर एटीएसची नजर असून, अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. याबाबत स्थानिक पोलिस चुप्पी साधून असून, एटीएसच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.