127 वर्षांच्या पंरपरेला खंड; मिरवणुकीविनाच होणार विसर्जन

विवेक मेतकर
Tuesday, 1 September 2020

वैभवशाली व ऐतिहासिक परंपरा असलेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच खंडित होणार आहे. मानाच्या बाराभाई गणपतींसह सर्वच गणपतींचे विसर्जन करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मिरवणूक परंपरेत खंड पडला असला तरी भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला मोर्णा नदी जवळ बणवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांसह इतर कृत्रिम कुंडात निरोप देवू शकतील.

अकोला  : वैभवशाली व ऐतिहासिक परंपरा असलेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच खंडित होणार आहे. मानाच्या बाराभाई गणपतींसह सर्वच गणपतींचे विसर्जन करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मिरवणूक परंपरेत खंड पडला असला तरी भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला मोर्णा नदी जवळ बणवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांसह इतर कृत्रिम कुंडात निरोप देवू शकतील.

जिल्ह्यात गणेशोत्सव थाटात साजरा करण्यात येतो. त्यामुळे येथील गणेशोत्सवाला भव्यता लाभली आहे. प्रत्येक वर्षी गणेश मंडळांसह सार्वजनिक गणेशोत्सव समिती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमणापासून विसर्जनापर्यंत उत्सव साजरा करते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामध्ये अबाल-वृद्धांसह इतर नागरिक मोठ्‍या उत्साहाने सहभाग घेतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी जयहिंद चौकातून भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यामध्ये लाखोंच्या संख्यने नागरिक सहभागी होतात. मिरवणूक मार्गावर आकर्षक रोषणाईसह विविध प्रकारचे जनजागृतीपर फलक सुद्धा लावण्यात येतात. त्यामुळे विसर्जन मिरवणूक ही देखणी असते.

मात्र, कोरोनामुळे या आनंदावर यंदा पाणी फेरले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यासह महानगरता मोजक्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतींची स्थापना केली. ज्या मंडळांनी गणेश स्थापनेस पुढाकार घेतला त्यांनी कोरोनाचे संक्रमण बघता रोषणाईला सुद्धा कमी महत्व देत जनजागृतीवर भर दिला.

त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्यात आला. दरम्यान आता गणेश विसर्जन मिरवणुकीवर सुद्धा कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे यावर्षी प्रथमतः विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गणेश भक्तांचा हिरेमोड झाला आहे.
 
गणेश घाट सज्ज; वैयक्तिक विसर्जनालाच परवानगी
दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे मोर्णा नदीच्या काठावर गणेश कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस स्टेशन जवळी गणेश घाटावर सात कुंड तयार करण्यात आले आहे. हरिहर पेठ येथील गणेश घाटावर जुने शहरातील नागरिकांकरिता विसर्जनासाठी कुंड तयार करण्यात आले आहे. निमवाडी येथेही मोर्णा नदीच्या काठावर विसर्जनाची तयारी करण्यात आली. याशिवाय हिंगणा येथे मनपातर्फे मोर्णा नदीच्या काठावर गणेश कुंड तयार करण्यात आला. याशिवाय गणेश विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रभाग निहाय गणेश विसर्जन कुंड तयार करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola 127 years of tradition; Immersion will take place without procession