13 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड, पाच सप्टेंबरला आॅलनाइन पद्धतीने वितरण

अरूण जैन 
Thursday, 27 August 2020

विभागीय आयुक्तांनी यादीला आणि कार्यक्रम आयोजन करण्याला मंजूरी दिली तर ५ सप्टेंबरला पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर निवड समितीने प्रत्येक तालुक्यातून एक अशा १३ शिक्षकांची तर दोन माध्यमिक शिक्षकांची निवड केली आहे.

बुलडाणा : जिल्हा परिषदतर्फे दरवर्षी शिक्षक दिनी दिल्या जाणाऱ्या सन २०१९-२० च्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ३४ प्राथमिक शिक्षकांची पडताळणी समितीसमोर हजेरी झाली आहे.

विभागीय आयुक्तांनी यादीला आणि कार्यक्रम आयोजन करण्याला मंजूरी दिली तर ५ सप्टेंबरला पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर निवड समितीने प्रत्येक तालुक्यातून एक अशा १३ शिक्षकांची तर दोन माध्यमिक शिक्षकांची निवड केली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विविध क्षेत्रात चांगली कामगीरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. या पुरस्कारासाठी शिक्षकामध्ये चुरस असते. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना यापूर्वी एक वेतनवाढ देण्यात येत होती. मात्र, शासनाने ही वेतनवाढ बंद केली आहे.

तरीही सन्मानांच्या असलेल्या या पुरस्काराची जिल्ह्यातील शिक्षकांना प्रतीक्षा असते. या पुरस्कारासाठी पडताळणी समिती आणि निवड समिती असे दोन टप्पे असतात. समितीकडून निवड झाल्यानंतर ही यादी विभागीय आयुक्तांकडे मंजूरीसाठी पाठविली जाते.

विभागीय आयुक्तांनी मंजूरी दिल्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करून शिक्षक दिनी पुरस्काराचे वितरण करण्यात येते. मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो.

तसेच सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असते. यावर्षी कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविले होते.

४५ शिक्षकांनी पाठविले होते प्रस्ताव
जिल्हाभरातून ४५ शिक्षकांनी प्रस्ताव पाठविले होते. त्यातील चार खासगी शाळांच्या शिक्षकांचे आले होते. ४१ शिक्षकांना पडताळणी समितीसमोर बोलावण्यात आले होते.

त्यापैकी ३४ शिक्षक प्रत्यक्ष हजर होते. या शिक्षकांमधून प्रत्येक तालुक्यातून एक अशा १३ प्राथमिक आणि दोन माध्यमिक शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची यादी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola 13 teachers selected for Ideal Teacher Award, distributed online on September 5