आणखी एक कोरोना बळी, नव्या ३० रुग्णांची भर, एका आत्महत्येसह ५८ कोरोना मृत्यू 

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 20 June 2020

अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. दरदिवसाला ३० हून अधिक रुग्ण आढळत असल्याने अवघ्या तीनच दिवसांत शंभर रुग्ण आढळत आहेत. अशात शुक्रवारी (ता.१९) एका रुग्णाचा मृत्यू झाला तर आणखी नव्याने ३० रुग्ण आढळून आले

अकोला  ः अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. दरदिवसाला ३० हून अधिक रुग्ण आढळत असल्याने अवघ्या तीनच दिवसांत शंभर रुग्ण आढळत आहेत. अशात शुक्रवारी (ता.१९) एका रुग्णाचा मृत्यू झाला तर आणखी नव्याने ३० रुग्ण आढळून आले.

शुक्रवारी कोरोना संसर्ग तपासणीचे २७७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २४७ अहवाल निगेटिव्ह तर ३० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटरमध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज एकाचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ११३६ झाली आहे. आजअखेर ३३५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ८०४२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७७२१, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८०१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ६८८२ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल ११३६ आहेत.

शुक्रवारी ३० रुग्णांची भर
शुक्रवारी दिवसभरात ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व सात पुरुष आहे. त्यात अकोटफैल येथील पाच, बाळापूर येथील ४, तर जेतवन नगर, कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे ‍रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील अकोटफैल येथील तीन तसेच सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अनिकट, आदर्श कॉलनी, हरिहर पेठ, आंबेडकर चौक, अकोट, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

८२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
१८ जून रोजी रात्री उपचार घेताना एकाच मृत्यू झाला. त्यात हरिहरपेठ, अकोला येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू असून ते कालच दाखल झाले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-११३६
मृत्यू-५८
आत्महत्या-१
डिस्चार्ज- ७४२
दाखल रुग्ण -३३५
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Another corona victim, 30 new patients added, 58 corona deaths including one suicide