
Akola News : जिल्ह्यात ४३.५० कि.मी.च्या आठ रस्त्यांना मंजुरी
अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुमारे ४३.५० किलोमीटर लांबीच्या आठ रस्त्यांना शासनाकडून मंजुरी प्राप्त करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबुतीकरण व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलताना ग्रामीण रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी भाजप प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार अकोला पूर्व मतदारसंघातील एकूण आठ रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास अंतर्गत राज्य मार्ग ४७ ते ढगा - कवठा - विटाळी - वरुड जऊळका रस्ता ( ८ कि.मी.), रा.मा. २८१ ते नखेगाव - पिलकवाडी रस्ता (५ कि.मी) तसेच टाकळी ते हनवाडी रस्ता रा.मा. ( ७ कि.मी.) रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या नियमित रस्ते विकासांतर्गत येवता - कुंभारी - बाभूळगाव - रस्ता ( ६ कि.मी,) रा.मा. ६ ते राजापूर - अन्वी मिर्झापूर ते दहीगाव (गावंडे) रस्ता ( ९ कि.मी), सांगळूद ते अनकवाडी रस्ता ( ३.५ कि.मी), करोडी फाटा ( रमां २८१) ते पानेट रस्ता (ग्रामा ५०) (२ कि.मी) मारोडी ते लाखोंडा रस्ता (ग्रामा १५६) (३ कि.मी) रस्त्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे लक्ष्यांक वाढीची मागणी
अकोला जिल्ह्यातील काळ्या मातीचे क्षेत्र खोल असल्याने रस्ते सतत खराब होतात. ग्रामीण भागातील रस्त्यांची निकड लक्षात घेता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी योजनेचे लक्ष्यांक वाढवून देण्यात यावे तसेच संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी रस्त्यांची वाढीव लांबी मंजूर करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालक मंत्री अकोला जिल्हा आणि राज्याच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना केली आहे.