
Akola : बहुजन मुक्ती पार्टीकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी
अकोला : बहुजन मुक्ती पार्टीकडून शुक्रवारी (ता.२४) केंद्रीय अर्थसकंल्पाची होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीने भारतीयांची केंद्र सरकारकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
गतवर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाचे बजेट हे कमी असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीकडून करण्यात आला. बहुजन विकास पार्टीच्या दाव्यानुसार गतवर्षीच्या बजेटमध्ये शिक्षणावर २.६४टक्के तर यंदाच्या(सन२०२३-२४) बजेटमध्ये २.५१टक्के तरतूद आहे. आरोग्यावर गतवर्षी २.२० टक्के तर यंदा १.९८ टक्के, शेतीवर २.८४ टक्के तर यंदा २.२० टक्के, ग्रामीण विकाससाठी गतवर्षी ५.८१ टक्के तर यंदा ५.२९ टक्के तरतूद आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी गतवर्षी १५ हजार ५०० कोटींची तरतूद होती, यंदा मात्र ही तरतूद १३ हजार ६३५ कोटींची आहे. मनरेगासाठी ७३ हजार कोटींची तरतूद गतवर्षीच्या बजेटमध्ये होती, मात्र यंदा ही तरतूद ६० हजार कोटींची आहे. पंतप्रधान सन्मान योजनेसाठी गतवर्षी ६८ हजार कोटी तरतूद होती, या बजेटमध्ये मात्र ६० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एग्रीकल्चर फर्टीलायझरसाठी तरतूदही यंदाच्या बजेटमध्ये कमी करण्यात आली.
अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयअंतर्गत गतवर्षीची तरतूद पाच हजार २० कोटी होती. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये तीन हजार १७ कोटींची आहे. अशाप्रकारे अशाप्रकारे केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्य भारतीयांसाठी कमी तरतूद आहे.
त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीतर्फे बजेट जलाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात चंदन वानखडे, गजज दोड, प्रवीणा भटकर, नंदकिशोर धाकडे, लता गुजर, देवानंद अवचार, सदानंद तायडे, दीपक शेगोकार, इकबाल शाहिद,विलास बोधनकर,वाय. जी. इंगोले आदी सहभागी झाले.