धुव्वाधार पाऊस, जनजीवन विस्कळीत... बुलडाणा जिल्ह्याला सर्वदूरपावसाने झोडपले

अरूण जैन 
Tuesday, 22 September 2020

रविवारी रात्री बुलडाणा तालुक्यात व पैनगंगा नदीच्या पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण यावर्षी दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले. परिणामी पैनगंगा नदीला पूर आल्याने बुलडाणा- चिखली रस्ता बंद झाला. काही तासांसाठी वाहतूक बंद झाली होती. नदी लगतच्या शेतांमधे पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बुलडाणा ः रविवारी रात्री बुलडाणा तालुक्यात व पैनगंगा नदीच्या पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण यावर्षी दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले. परिणामी पैनगंगा नदीला पूर आल्याने बुलडाणा- चिखली रस्ता बंद झाला. काही तासांसाठी वाहतूक बंद झाली होती. नदी लगतच्या शेतांमधे पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

चिखली रस्ता पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने बंद झाला.

 
सरासरी २९ मिलिमीटर पाऊस; सर्वाधिक ६९.६ मि.मी. सिंदखेडराजात
 संपूर्ण जिल्ह्याला रविवारी (ता. २०) रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये सर्वाधिक पाऊस सिंदखेड राजा तालुक्यात ६९.६ मिलिमीटर एवढा झाला. प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या बळीराजाची चिंता अधिक वाढली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. सोयाबीनचे पीक पक्व अवस्थेत असून, अनेक ठिकाणी सोयाबीनला काढणीसाठी स्वच्छ वातावरण व उन्हाची आवश्यकता आहे. दर दोन दिवसाआड पाऊस येत असल्याने शेती आधीच भिजलेली आहे.

अशा परिस्थितीत रविवारी रात्री पावसाने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. पाऊस आणि वाऱ्याचा वेग सर्वाधिक असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याशिवाय भाजीपाला व फळांचेही मोठे नुकसान झाले आहे ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. येळगाव धरणाची दारे उघडल्याने चिखली-बुलडाणा मार्ग बंद होता. या पावसामुळे जिल्ह्याने सर्वसाधारण पर्जन्यमानाची ८८ टक्के सरासरी पार केली आहे.

जिल्ह्यातील पावसाची सरासरी
बुलडाणाः २७.६ मि.मि.
चिखली ः २०.१ मि.मि.
देऊळगाव राजाः २०.२ मि.मि.
सिंदखेड राजा ः ६९.६ मि.मि.
लोणार ः ३३.२ मि.मि.
मेहकरः ४२.२ मि.मि.
खामगावः २८.५ मि.मि.
शेगाव ः १८.१ मि.मि.
मलकापूर ः २०.५ मि.मि.
नांदुरा ः २७.१मि.मि.
मोताळा ः ११.७ मि.मि.
संग्रामपूर ः २५.३मि.मि.
जळगाव जामोथेः ४.८ मि.मि.
सरासरी ः २९.१ मि.मि.


वादळी पावसाचा शेतीपिकांना फटका
मोताळा : तालुक्यात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. सोबतच संबंधीत यंत्रणेला तत्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची मका, कपाशी, ज्वारी, ऊस यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी तालुक्यातील मूर्ती, वाघजाळ, परडा, टाकळी, दाभा, नाईकनगर या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : अनिल खाकरे
वादळी वारा व जोरदार पावसामुळे तालुकाभरातील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सतत नुकसानीचा सामना करावा लागत आहे. संबंधीत यंत्रणेने या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल खाकरे-पाटील यांनी मोताळा तहसीलदार व्ही.एस. कुमरे यांना केली आहे.

नांदुरा तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्याचे थैमान
नांदुरा ः तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले होते. सलग दुसऱ्या दिवशीही रात्रभर वादळी वाऱ्यासह पावसाने खरिपाचे हाती आलेल्या पिकावर पाणी फेरले आहे. यावर्षी खरिपाची पेरणी व्यवस्थित झाली. पाऊसही जेमतेम राहिल्याने पिकेही चांगली बहरली. मात्र आता ऐन पीक परिपक्व अवस्थेत असताना शनिवारी व रविवारी सतत दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उभे पीक जमीनदोस्त झाली. यासाठी महसूल विभागाने त्वरित नुकसानीचे सर्व्हे करून बळीराजाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

मागील रब्बी हंगामात अवकाळीने कहर करून हातचे पीक हिरावले होते. त्यात कोरोनाचे संकट घोंगावल्याने मदत हवेतच विरली. आताही सर्व खरीप पिकांचे अतोनात नुकसान अवकाळीनेे केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने भरीव अशी २५ हजार रुपये मदत आतातरी द्यावी.
- रवींद्र मापारी, शेतकरी, खैरा.


धामना नदीला पूर; धाड औरंगाबाद रस्ता बंद
धालः रविवारी रात्री परिसरात धाडसह म्हसला, सातगाव, मौढाळा येथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धामना नदीला मोठा पूर आला. म्हसला गावाजवळील धामना नदीवर पुलाचे बाधकाम सुरू असल्यामुळे पर्यायी पुलावरून वाहतुक सुरू असते. हा रस्ता पाण्याखाली गेलामुळे धाड-औरंगाबाद रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी पारध मार्गे वाहणे वळविण्यात आली. या पावसामुळे सोयाबीन शेंगा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


देऊळगाव राजा तालुक्यात पावसामुळे दाणादाण
देऊळगाव राजा ः तालुक्यात गत तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, खडकपूर्णा नदीपलीकडे बहुतांश भागात कापूस सोयाबीन मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. सर्वच पिके पावसाच्या अतिप्रमाणात मुळे बाधित झालेली होती. मूग,उडीत हातचे गेल्या नंतर कापूस, सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पिकांसाठी मुबलक पाऊस झाला असताना या पावसामुळे बहुतांश शेती चिभडली. मिरची पिकावर फांदीभर रोगाची लागण झाल्याने मिरची पीक प्रभावित झाले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
सिंदखेडराजा ः तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ घातल्याने हजारो हेक्टर वरील कपाशी व सोयाबीन पिके पाण्याखाली गेली आहेत. विद्रुपा नदीने रौद्र रूप धारण केले. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने. त्यातील सोयाबीन, कपाशी. मिर्ची पाण्याखाली आल्याने पिके जमीनदोस्त झाले आहे. वर्दडी जांभोरा व परिसरातील सर्व खेड्यापाड्यांचा शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. सोनोशी लगतचा रोडवर असलेला पूल पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे वाहतूक शंभर टक्के बंद झालेली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: Heavy rains, life disrupted ... Buldana district was hit by torrential rains