देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीने शिवसेनेतील ‘वंचित’ राजे आज भाजपात जाणार

विवेक मेतकर
Tuesday, 25 August 2020

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे मन ‘वंचित’मध्ये रमत नसल्याचे दिसत होते. त्यांना पक्ष प्रवेशासाठी मंगळवारचा मुहूर्त सापडला आहे. मुंबईत त्यांचे काही समर्थकांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भाजपत दाखल होणार आहेत.

बुलडाणा : जिल्ह्यातील शिवसेनेचे दमदार नेते व तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे विजयराज शिंदे वंचित बहुजन आघाडीमार्गे उद्या, ता. २५ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये दाखल होत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे मन ‘वंचित’मध्ये रमत नसल्याचे दिसत होते. त्यांना पक्ष प्रवेशासाठी मंगळवारचा मुहूर्त सापडला आहे. मुंबईत त्यांचे काही समर्थकांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भाजपत दाखल होणार आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक असलेल्या विजयराज शिंदे यांना आजवर पाच विधानसभेच्या निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. यापैकी १९९५, २००४ व २००९ अशा तीन निवडणुकांमध्ये त्यांनी विजयश्री संपादन केलेली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने एक राजकीय तडजोड म्हणून श्री. शिंदे यांनी ‘वंचित’चा झेंडा हाती घेतला होता.

त्यातही त्यांनी अवघ्या आठ दिवसात गोळाबेरीज करून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवल्याने ते राजकारणात अधिक सक्रिय झाले होते. मात्र निवडणुका होऊन वर्ष उलटले तरी श्री. शिंदे यांच्या खांद्यावरील भगवा कायम होता.

त्यामुळे त्यांची शिवसेनेतच राहण्याची इच्छा होती. मात्र जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामध्ये एकाकी किल्ला लढवत असलेल्या श्री. शिंदे यांना आता भाजप हा सुरक्षित पर्याय वाटू लागला असावा.

त्यामुळे ते आता भाजपमध्ये जाऊन काय करतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. राजकीय खेळी करण्यात चाणाक्ष असलेल्या विजयराज शिंदे यांच्यासाठी आगामी काळात मतदारसंघाची पुनर्बांधणी करून पुन्हा मैदानात उतरण्याचे आव्हान राहणार आहे.

त्यांनी विजयश्री मिळविलेल्या तीन निवडणुका त्यांनी भाजप सोबतच्या युतीमध्ये लढलेल्या आहेत. शिवाय भाजपमधील वरिष्ठ पातळी पासून ते राज्यातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत.

आता कोणती खेळी?
नगरसेवक, नगरपालिका सभापती, जिल्हाप्रमुख, आमदार, पक्ष प्रतोद यासह विविध पदांवर काम करणारे व सातत्याने क्रियाशील असलेल्या विजयराज शिंदे यांना भाजपने पुनर्वसनासाठी कोणता शब्द दिला आहे, की काळाची पावले ओळखून श्री. शिंदे यांनी स्वतः बिनशर्त भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याची उत्सुकता जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांना लागून राहिलेली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Shiv Sena leader Vijayraj Shinde will join BJP in the presence of Devendra Fadnavis