वा रे वा पाऊस! भिंती खचल्या, चुली विझल्या अन् पिकेही गेले वाहून 

अरूण जैन 
Thursday, 20 August 2020

बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसाने चांगलाच कहर केला आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड चांडोळमध्ये झालेल्या संततधार पावसाने खरिपाची पिके हातची गेली, जनावरे वाहून गेली, शेती व घरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

बुलडाणा  ःबुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसाने चांगलाच कहर केला आहे.

बुलडाणा तालुक्यातील धाड चांडोळमध्ये झालेल्या संततधार पावसाने खरिपाची पिके हातची गेली, जनावरे वाहून गेली, शेती व घरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पुराच्या तडाख्याने धाड परिसर अस्ताव्यस्त !
धाड : दोन दिवसापूर्वी परिसरात झालेल्या संततधार पावसाने खरिपाची पिके हातची गेली, जनावरे वाहून गेली, शेती व घरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. बुलडाणा तालुक्यातील धाड व परीसरात १७ आँगस्ट रोजी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे धाड, चांडोळ, म्हसला, कुंबेफळ, सातगाव, डोमरुळ, वरुड, टाकळी, सोयगाव, जामठी, इरला, ढंगारपुर, भडगाव, मोहोज या नदीच्या काठच्या गावांना भरमसाठ प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका बसला. या भागातील करडी, मासरुळ, शेकापूर, ढालसावंगी, बोदेगाव येथील धरणे ओसंडून वाहिली.

तर प्रमाणाबाहेर पाऊस झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते. नजीकच्या कुंबेफळ गावातील गणेश रामभाऊ वाघ ह्यांच्या शेतातील गोठ्यातील चार बकऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. तर बाणगंगा नदीचे पाणी करडी धरणातून ओव्हरफ्लो होऊन कुंबेफळ गावाच्या नदीस येत असल्याने या नदीच्या काठावर असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. नदीच्या काठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.

तर चांडोळ येथील धामणा नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी गेल्याने जवळपास १४५० शेतकऱ्यांना पुराचा जबर फटका बसला आहे, याठिकाणी ९६० हेक्टर खरीपाच्या पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर करडी धरणाच्या खालच्या भागातील कुंबेफळ, सातगाव, टाकळी, म्हसला या गावात शेतातील शेतकऱ्यांचे स्पिंकलर संच, कृषी औजारे, ठिबक संच, पाईप आणि साहित्य वाहुन गेले आहेत.

Image may contain: tree, plant, outdoor, water and nature

घरांची पडझड, पीक गेले वाहून
धाड आणि बोरखेड धाड येथे १० घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर अंदाजे २०० हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. सावळी येथे १५ घरांच्या भिंती पडल्या आहेत व ५० हेक्टर वर पिकांचे नुकसान झाले आहे, रुईखेड मायंबा येथे ७ घरांच्या भिंती पडल्या आहेत, व ६० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे, म्हसला येथे २ घरांच्या भिंती पडल्या आहेत, तर ३२ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. मौढांळा येथे २ घरांच्या भिंती पडल्या आहेत, जांब येथे ३ घरांच्या भिंती पडल्या आहेत. इरला येथे ३ घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर भडगाव येथे एका घराची भींत पडली आहे. तसेच म्हसला खु. गावातील २२ हेक्टर, ढंगारपुर येथील २५ हेक्टर, भडगाव येथील २५ हेक्टर, मोहोज येथील ३० हेक्टर आणि इरला मधील १२० हेक्टर, ढालसावंगी ५७ हेक्टर, जामठी येथील ५ हेक्टर शेती पुराच्या पाण्याने बाधित झाली आहे.

Image may contain: plant, tree, grass, outdoor and nature

सर्वेक्षणाचे काम सुरू, मदतीची प्रतीक्षा
अतिवृष्टीमुळे धाड भागाला पुराचा तडाखा बसला आहे. महसूल विभागाच्या वतीने सध्या युध्द पातळीवर गावातील आणि शेतीचा सर्वेक्षण पाहणीचे काम सुरु आहे. बहुतेक ठिकाणी पुराच्या पाण्याने खरीपाच्या पिकांची नासधूस झाली आहे. धाड आणि परीसरातील १३ नदीच्या आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतीचे १५९० हेक्टरवर नुकसान झाले आहे. अजुनही काही गावात शेती नुकसान पाहणी सुरुच होती. तसेच धाड सह उपरोक्त गावात ७० घरांच्या भिंती अतिवृष्टीमुळे पडल्याने नागरिकांना त्रास झाला. याठिकाणी तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात अधिकारी अशोक शेळके ह्यांच्या नेतृत्वात धाड व म्हसला मंडळातील तलाठी आणि कृषी सहायक शेती नुकसानीची पाहणी करत आहेत.

Image may contain: outdoor, nature and water

कारवाई करा
बोर्डे नगर मधील तब्बल ७०० ते ८०० नागरीकांच्या घरामध्ये पाणी शिरून संपूर्णपणे आमचा संसार उघड्यावर आला. पाणी जाण्याच्या रस्त्यामध्ये काही धनदांडग्यानी भराव टाकून पाणी अडविले आहे. सिमेंट पाईप जवळील हा भराव काढण्यात यावा व येथील नाल्याचे रुंदीकरण करण्यात यावे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी.
-बोर्डे नगर रहीवासी, धाड.

घरांच्या भिंती पडुन जे काही अशंत:नुकसान झाले आहे,आणि शेतीतील खरीपाच्या पिकांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल वरीष्ठ पातळीवर देण्यात येऊन बाधीतांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत होईल.
-संतोष शिंदे. तहसीलदार बुलडाणा.

Image may contain: tree, plant, outdoor, water and nature

धामणा नदीच्या पुरात १२५० हेक्टर जमीनीसह पिकांचे नुकसान
चांडोळ : मागील काही दिवसा पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धामणा नदीने सोमवार रोजी अचानक रौद्ररूप धारण केल्याने आलेल्या महापुरामुळे चांडोळसह परिसरातील म्हसला, ढंगारपूर, इरला येथील नदीकाठच्या शेतकऱ्यांची जवळपास १२५० हेक्टर जमीनीसह पिंकाचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी एन. पी. देठे आणि चव्हाण यांनी दिली.

शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर, शेती उपयोगी साहित्य, शेतातील उभी पिके, पशुधननांसाठी ठेवलेली कडबाकुट्टी, चारा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चांडोळ, इरला, म्हसला, धाड येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. महसूल कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्वे करण्याच्या सुचना दिल्या.

Image may contain: tree, plant, grass, outdoor, nature and water

तसेच पिकांची व जमिनीची नासाडी पाहून त्यांनी शेतकऱ्यांना तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देत संकटाने खचून न जाण्याचे सांगितले. धाडचे सरपंच रिजवान सौदागर, उपसरपंच दिलीप खांडवे, मो.शफी, प्रभाकर वाघ, माजी सरपंच शिवाजी सोनुने, मदन जंजाळ, बाबा देशमुख, शाहीद बेग, राजू धनावत, चंदन चांदा, भागवत सरोदे सह अनेक शेतकरी तसेच गजानन मरमट, मोहम्मद मुश्ताक, नदीम शेख उपस्थित होते.

देऊळगावराजात उडीद मूग हातचे गेले
मागील आठवडाभर सततच्या पावसाने तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे उडीद मूग हातचे गेले असून, कापूस पिकावर फुलकिडे व अळीचा प्रादुर्भाव तर मिरची पिकावर रोगराई पसरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

चिखली तालुक्यातही मोठे नुकसान
दोन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे चिखली तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान १४५९ हेक्‍टरवर सोयाबीनची झाले आहे. या खालोखाल मुगाच्या पिकाचे ३२५ हेक्टर मध्ये नुकसान झाले आहे. तर तुरीचे ३४ हेक्टरवर व इतर पिकांचे सुमारे ५० हेक्टर चे नुकसान झाले आहे. याशिवाय तालुक्यातील दोन विहिरींचे ही मोठे नुकसान झाले आहे.

सर्वे करून तत्काळ नुकसान भरपाई द्या
बुलडाणा : दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली याचा तात्काळ सर्वे करून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आमदार संजय गायकवाड व जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील धाड, मासरूळ, चांडोळ, म्हसला, दुधा, माळवंडी आदी भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे नद्यांना महापूर आले व पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले त्यामुळे उभ्या पिकाची नासाडी झाली आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्या. आधीच कोरोनामुळे संकटग्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये यामुळे भर पडली आहे.

Image may contain: plant, tree, grass, outdoor and nature

त्यामुळे या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, आमदार संजय गायकवाड, तालुका प्रमुख लखन गाडेकर, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संजय हाडे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष विजय जायभाये, उमेश कापुरे, दीपक सोनुने, दीपक तुपकर, किरण देशपांडे, प्रकाश गाडेकर आदी उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News The walls were eroded, the stove went out and the pike was carried away