
अकोला : ‘सेठजीला मुलगा झाला, कपडे वितरण सुरू!’
अकोला : ‘शेठजी को बहुत साल बाद लडका हुवा है, वहा कपडे और किराणा बाट रहे है, आपभी चलीये’, अशा भूलथापा देवून वयोवृद्ध महिलांना लुबाडणारी टोळी अकोला शहरात सक्रिय झाली आहे. सलग दोन दिवस घडलेल्या अशा घटनांमुळे पोलिसांनी नागरिकांनी व विशेषतः महिलांना कोणत्याही भूलधापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
अकोला शहरात मंगळवार, ता. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जुने शहर पोलिस ठाणे हद्दीतील वाशीम बायपास नजीक रिजवान कॉलनीत एका ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेसोबत अशीच घडना घडली. बाजारपेठेतून खरेदी करून त्या घरी एकट्याच जात होत्या. त्याचवेळी दोन अनोळखी इसम तेथे आले.‘सेठजींना खूप वर्षांनी मुलगा झाला, ते बाजूलाच कपड्यांचे वितरण करीत आहेत. तुम्ही पण चला, तुम्हाला पण दोन कपडे मिळतील’, अशी भुलथाप मारून त्यांना थोड्या अंतरावर नेले. महिलेच्या गळ्यातील दागिने व नगदी रक्कम वेगळी काढायला लावून लबाडीने घेवून पळून गेले.
या घटनेची पुनरावृत्ती बुधवार, ता.३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाली. एक वयोवृद्ध महिला फतेह चौक मार्गाने खरेदी करीत असताना अनोळखी इसमांनी तिचे जवळ येवून ‘शेठजी को बहुत साल बाद लडका हुआ है, वो बाजू मेंही सबको साडी बाट रहे है, तुम भी चलो, तुम्हें भी वो साडी देंगे’ अशी भुलथाप दिली. थोड्या अंतरावर घेवून गेल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिणे व नगदी रक्कम वेगळी काढायला लावून पोबारा केला. याबाबत रामदासपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिस विभाग सतर्क झाला आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलसि निरीक्षक संतोष महल्ले व जिल्हा पोलिस दलाचे वतीने नागरीकांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या असून, अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
एकट्याने बाहेर पडणे टाळा
महिलांनी विशेषतः वयोवृद्ध महिलांनी कामानिमित्त घराबाहेर एकट्याने जाण्याचे टाळवे.
घराबाहेर एकटे पायदळ जाणे आवश्यक असल्यास अनोळखी इसमांशी बोलणे टाळावे.
कोणताही अनोळखी इसमांच्या भुलथापांना बळी पडून, त्याचे सोबत जावू नये.
अनोळखी इसम पोलिस असल्याची बतावणी करून सोबत चलायला सांगत असेल सोबत जावूनये.
अनोळखी इसमाने भुलथाप मारून अंगावरील दागिणे काढायला सांगितल्यास तसे करू नये.
घटना घडल्यास जवळच्या नातेवाई किंवा प्रतिष्ठानातील लोकांच्या मदतीने तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
Web Title: Akola City Robbery Gang Lure To Elderly Women Police Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..