अरे देवा ! कोरोनाचा उद्रेक सुरुच; या तालुक्यात गेला कोरोनाचा पाचवा बळी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

शहरात दोन दिवसांपूर्वी एका 78 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी (ता.14) रोजी पुन्हा बाळापूर शहरातील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. तर वाडेगावातील एका नव्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने वाडेगावातील नागरिकांची चिंताही वाढू लागली आहे.

बाळापूर (जि. अकोला) : शहरात दोन दिवसांपूर्वी एका 78 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी (ता.14) रोजी पुन्हा बाळापूर शहरातील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. तर वाडेगावातील एका नव्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने वाडेगावातील नागरिकांची चिंताही वाढू लागली आहे.

क्लिक करा- कोरोना इफेक्ट : या वर्गाचा अभ्यासक्रम जैसे थे; जुन्या अभ्यासक्रमातील पुस्तके शाळांना सादर

परिसरात करण्यात आली औषध फवारणी
अकोल्यातून बाळापूर तालुक्यात दाखल झालेल्या कोरोना विषाणूने बाळापूर शहरासह वाडेगावात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या 19 झाली असून, त्यापैकी आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भावना हाडोळे यांनी दिली आहे.

रविवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार वाडेगावातील सोफी चौकातील एका 58 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वाडेगावातील आतापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे. इंदिरानगरानंतर आता सोफी चौकात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग हतबल होत असल्याचे स्पष्ट होते. सोफी चौकात कन्टेमेंन्ट झोन तयार करून ग्रामपंचायत प्रशासनाने औषध फवारणी करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा, ग्रामसेवक दादाराव अंभोरे, सहा. पोलिस निरीक्षक महादेव पडघन या परिसरात लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा- हवामान विभागाचे संकेत; विदर्भातील या जिल्ह्यांत आठवडाभर जोरदार पाऊस, हे आहे कारण

‘त्या’ बाधीत महिलेचा दहा मिनिटातच मृत्यू
बाळापूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या सय्यदपुरा भागातील एका 45 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने तीला शनिवारी (ता.13) रोजी सर्वोपचार मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल केल्यानंतर तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर तीच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. रविवारी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तीला किडनीचा आजार होता, अशीही माहिती प्राप्त झाली आहे. महिलेच्या मृत्यू नंतर शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या आता पाचवर गेली आहे. यापूर्वी चार जणांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Corona's fifth death in Balapur city