नवऱ्याला सोडून विवाहितेचे ‘मामा’सोबत पलायन ; नवऱ्याची पोलिसात धाव - Akola crime police married woman Leaving Mama | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News

नवऱ्याला सोडून विवाहितेचे ‘मामा’सोबत पलायन ; नवऱ्याची पोलिसात धाव

बाळापूर : तालुक्यातील एका गावात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेच्या प्रेमात तिचाच मामा पडला. आणि दोन मुलांची आई असलेली भाची नवऱ्याचे घर सोडून मामा सोबत पळाली.

भाची आणि तिचा मामा या दोघांच्या प्रेमाची चर्चा तालुक्यात पसरली आहे. चार दिवसांपूर्वी आपल्या नवऱ्याचे घर सोडून २५ वर्षीय विवाहिता एका तीन वर्षाच्या मुलीला घेऊन मामासोबत पळाली आहे.

या प्रकारामुळे तिचा पती चक्रावून गेला असून, त्याने उरळ पोलिसात धाव घेतली आहे. सदर विवाहिता ता.१५ मार्च रोजी माहेरी जात असल्याचे सांगत घरून निघून गेली. तिच्या पतीने तिच्या माहेरी फोन करून विचारपूस केली असता, हा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे या महिलेला दोन मुले असून, एक पाच वर्षाचा मुलगा तिने घरी ठेवून तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती पळाली आहे. उरळ पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

‘मामा’-‘भाची’च्या प्रेम कहाणीची परिसरात चर्चा

आपल्याच विवाहीत भाचीसह फरार झालेला मामा आधीच विवाहित असून, त्याची पत्नीही त्याला सोडून गेली आहे.

खामगाव तालुक्यात असलेल्या गावातील मामाचे भाचीच्या लग्नापूर्वीच सुत जुळले असल्याची चर्चा आहे. भाचीचे लग्न झाल्यावरही या दोघांचे प्रेम बहरतच गेले. त्यामुळे मामाच्या पत्नीला याची कुणकुण लागल्याने ती त्याला सोडून गेली.

नात्याला काळीमा फासणारा प्रकार

आपली पत्नी घरुन निघून गेल्याची तक्रार तिच्या पतीने उरळ पोलिसांत दिली आहे. ही घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, ‘त्या’ महिलेच्या कुटुंबियांनी काहीही बोलणे टाळले आहे.

उरळ पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीने तक्रार दिली आहे. त्या अनुषंगाने पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. लवकरच या प्रकरणाची सत्यता बाहेर येणार आहे.

- अनंतराव वडतकर, ठाणेदार, उरळ पोलिस स्टेशन.