उद्याची परिस्थिती बिकट, एकजूट व्‍हा ; प्रकाश आंबेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Dhammachakra Pravartan Din

उद्याची परिस्थिती बिकट, एकजूट व्‍हा ; प्रकाश आंबेडकर

अकोला : बारा बलुतेदार, अलुतेदारांनो सत्तेचा माज अंगात येऊ देवू नका. उद्याची परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही. महागाई, आर्थिक संकट डोक्यावर आहे. हुकूमशाहीने चालणाऱ्या सत्तेचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजुट राहणे हाच एक पर्याय असल्याचा संदेश वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आंबेडकरी चळवळीतील मंत्र्यांच्या खुर्चीला चिकटून असलेल्या नेत्यांना व त्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या विचारवंतांना चांगलेच चिमटे घेतले. आंध्रप्रदेशाच्या विभाजनापूर्वीच्या तेथील सत्तेचे उदाहरण देत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेचा माज डोक्यात गेल्याने सत्ता कशी घालविली जाते, हे सांगितले.

सोबतच त्यांनी उद्याच्या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकसंघ राहण्याचा सल्लाही दिला. लोकसेवक म्हणून सत्ता चालविणारे हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहेत. त्यांची सत्ता घालविण्यासाठी लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी केला. राज्यात होऊ घातलेल्या आगामी संरपंच निवडणुकीत स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कापूस महासंघाला त्यांनी आवाहन करीत सर्व कापूस खरेदी करण्याचे व कापसाला नऊ हजार रुपये दर देण्याची मागणी सभेतून केली.

महागाई रोखा, अन्यथा आर्थिक संकट

पैशांच्या बळावर सत्ता मिळविणे सुरू आहे. जोकरासारखे सरकार चालविले जात आहे. राज्य कसे चालवावे, हेच माहित नसलेल्यांच्या हाती सत्ता आहे. विदर्भातील मुख्यमंत्री आहे. मात्र, विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. रुपयाची किंमत घसरत असल्याने महागाई वाढली आहे. ही महागाई वेळीच थांबविली नाही, तर आर्थिक संकट वाढणार, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

खूर्चीला चिकटून असलेल्यांना चिमटे

आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अनेकांनी सत्ता मिळविली. काही तर कायम स्वरुपी खुर्चीला चिकटून आहेत. त्यांना कायमचे मंत्रिपद दिले पाहिजे, असा टोला लावून ॲड. प्रकाश आंंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लक्ष्य केले. आठवले यांनी नुकतेच वंचित बहुजन आघाडी रिपाईमध्ये विलीन करण्याचे आवाहन केले होते. त्याला अप्रत्यक्षपणे ॲड. आंबेडकर यांनी उत्तर दिले.