धक्कादायक; 'या' ठिकाणी वर्षभरात 516 जणांचा कोरोनाने मृत्यू

In Akola district, 516 people died of corona during the year
In Akola district, 516 people died of corona during the year

अकोला: जिल्ह्यात गेल्यावर्षी 7 एप्रिलला कोरोनाचा शिरकाव झाला होता. तर गेल्यावर्षी 11 एप्रिल पासून मृत्यूचं सत्र सुरू झालं होतं. त्यावर अजूनही नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. वर्षभरात आता मृतकांचा आकडा 516 वर येऊन पोहोचला आहे. आणि गेल्या 12 दिवसात कोरोनाचे 61 बळी गेले आहेत. आता मार्चनंतर अकोलेकरांसाठी एप्रिल महिनासुद्धा घातक ठरतोआहे.

वैद्यकीय यंत्रणेसह समस्त नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कोरोनाला जिल्ह्यात ता. ७ एप्रिल २०२१ रोजी एक वर्ष होत आहे. गत वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील बैदपूरा भागातील रहिवाशी रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या एक वर्षात जिल्हाभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आतापर्यंत 516 रुग्णांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, लसीकरण सुरू होताच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने कोरोनाचे भय कायम आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातच कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला होता. नंतर महिनाभरात तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर मृत्यूचा हा आलेख वाढतच गेला. गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यची नोंद सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात तब्बल 84 मृत्यू झाले होते. त्यामुळे अकोलेकरांमध्ये दहशतीचे वातावरण होते. यानंतर रुग्णसंख्येच्या वाढीसोबत मृत्युदराच्या प्रमाणात अंकुश लावण्यात  विभागाला यश आलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये कोरोना महामारीविषयी भीती कमी होत गेली.

दिवाळीनंतरही परिस्तिथी काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. मात्र बाजारपेठा, लग्नसराईमध्ये नागरिकांकडून झालेल्या बेफिकीरीमुळे कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले. नव्या वर्षात पुन्हा रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली. फेब्रुवारी 2021 पासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली, ती अजूनही कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक 83 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र एप्रिल महिन्यात हा वेग  दुप्पट वाढल्याचं दिसत आहे.

गेल्या 12 दिवसांत 61 मृत्यू झाल्याने अकोल्यातील कोरोनाची परिस्तिथी गंभीर झाली आहे. कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये संवेदनशिलता असती तर,  जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कदाचित कोरोनाचा कहर वाढला नसता, बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, आरोग्य विभागाच्या नियमांची पायमल्ली यावरून अकोलेकर संवेदन शून्य झालेले दिसताये. कोरोनाच्या वाढत्या लाटेत प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून नियमांचं काटेकोर पालन केलं असतं तर हा उद्रेक काही प्रमाणात तरी टाळू शकले असते, आणि कोरोनाने गावलेले जीव वाचवू शकले असते.

आतापर्यंत वयानुसार आढळलेले रूग्ण
- ५ वर्षांपेक्षा कमी - २०८
- ५ ते १० वर्ष - ५२१
- ११ ते २० वर्ष - २ हजार ४२७
- २१ ते ३० वर्ष - ५ हजार ७३३
- ३१ ते ४० वर्ष - ६ हजार १३३
- ४१ ते ५० वर्ष - ५ हजार ७३२
- ५१ ते ६० वर्ष - ४ हजार ९४७
- ६० वर्षावरील - ४ हजार ९५२
---------------
कोट्यवधीचे नुकसान
देशात कोरोना आल्याने मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत अडीच ते तीन महिने कडक लॉकडाउन करण्यात आले होते. या लॉकडाऊन मध्ये सगळेच आप-आपल्या घरात होते. कोरोनामुळे लॉकडाउन लावल्यामुळे आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला शिवाय जिल्ह्यातील व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांना पोटाची भूक भागवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
-----------------
पहिले पॉझिटिव्ह रुग्ण सध्या ठणठणित
बैदपुरा परिसरात राहणारे जिल्ह्यातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या ठणठणित आहेत. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या तीन महिन्या आधी ते दिल्ली येथे गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. परत आल्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या घरातील नऊ सदस्यांना सर्वोपचारमध्ये क्वारंटाईन केल्यानंतर सात सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते; परंतु त्यांचा साडेतीन वर्षांचा नातू व सहा वर्षांची नात कोरोना बाधित आढळले होते. २२-२४ दिवस उपचार घेतल्यानंतर व कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. कोरोना मुक्तीनंतर जिल्ह्यातील पहिले रुग्ण सध्या ठणठणित आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com