सुट्यांमुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी आनंदात व्यत्यय | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सुट्यांमुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी आनंदात व्यत्यय!

अकोला : सुट्यांमुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी आनंदात व्यत्यय!

अकोला : सततच्या पावसामुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने ८४ कोटी २६ लाख व २ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यापैकी ५४ कोटी २६ लाख रुपयांचा निधी प्रशासनाने बॅंकांच्‍या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग सुद्धा केला आहे. परंतु गुरुवार (ता. ४) पासून सलग शासकीय सुट्‍या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची गती मंदावली आहे. त्यामुळे सोमवार (ता. ८) पासून शासकीय कार्यालय व बॅंका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात शासकीय मदत पोहचेल. या स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी सणात मात्र व्यत्यय आला आहे.

यावर्षी जिल्ह्यात २१ जुलैच्या रात्री ७ वाजतापासून जिल्ह्यात एकसारखा पाऊस कोसळला. पावसाचा जोर रात्री २ वाजेपर्यंत कायम राहिल्याने नदी-नाल्यांना पूर आला. अतिवृष्टीमुळे काही शेतात पाणी साचले तर काही भागातील शेतीच खरडून गेली. त्यासोबतच जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जिल्ह्यातील तीन ते चार तालुक्यांनाच बसला. त्यामुळे जून ते जुलै व ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसाचे प्रशासनामार्फत प्रत्येक ग्राम स्तरावर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ४९४.९४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांचे ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा: मुंबई : कांदिवलीतील हंसा हेरिटेज बिल्डिंगला आग; महापौर घटनास्थळी

त्यापैकी ९ हजार ३८ हेक्टरवरील शेतजमिन खरडून गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाने मदत निधी उपलब्ध करुन दिला होता. सदर निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा सुद्धा करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर जून ते जुलै मध्ये झालेल्या नुकसानीसाठी प्राप्त ८४ कोटी २६ लाख व ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीसाठी प्राप्त २ कोटी ७९ लाख रुपयांचे वाटप दिवाळी पूर्वी झाले नाही. त्यातच आता शासकीय सुट्‍यांमुळे अनुदान वाटपात अडथळा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मार्त अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बळीराजाचा अपेक्षाभंग

राज्य शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान उपलब्ध करुन दिले असले तरी त्याचे वाटप शासकीय यंत्रणांनी संथ गतीने केले. त्यातच आता दिवाळीच्या शासकीय सुट्यांमुळे अनुदान वाटपात व्यत्यय आला आहे. त्यामुळे सरकारी मदतीवर का होईना, दिवाळी सण साजरा करायचा आस लावून बसलेल्या बळीराजाचा यामुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.

असे केले निधीचे वाटप

जून ते जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीबाधितांसाठी शासनाने ८४ कोटी २६ लाख रुपयांचा निधी प्रशासनाला उपलब्ध करुन दिला होता. त्यापैकी ३ नोव्हेंबरपर्यंत ५२ कोटी २८ लाख १० हजार रुपयांचा निधी एक लाख २हजार २६७ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित ३१ कोटी ९७ लाख ९० हजार रुपयांचा निधी संबंधित सातही तालुक्यातील तहसिलदारांच्या बीडीएसवर शिल्लक आहे.

हेही वाचा: सांगली : भाऊबीज साजरी केल्यानंतर काही वेळात भीषण अपघात; बहिण-भावाचा मृत्यू!

ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या तीन तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २ कोटी ७९ लाख २८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ३ नोव्हेंबरपर्यंत १ कोटी ९८ लाख ५८ हजार रुपयांची शासकीय मदत ३ हजार ४६ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तर ८० लाख ७० हजार रुपयांची मदत संबंधीत तालुक्यातील तहसिलदारांच्या बीडीएसवर शिल्लक आहे.

Web Title: Akola Farmers Diwali Festivities Disrupted Due To Holidays

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Diwali FestivalAkola
go to top