अकोला : वाशीमची वाटचाल आता संत्रा हबकडे

सोयाबीन हब म्हणून कधीकाळी नावारुपास आलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाची भुरळ
Washim Orange Hub
Washim Orange Hubsakal

वाशीम : सोयाबीन हब म्हणून कधीकाळी नावारुपास आलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाने भुरळ घातली आहे. गेल्या दोन वर्षात संत्र्याखालील क्षेत्रात तब्बल चार हजार हेक्‍टरची वाढ झाली असून ते ११ हजार हेक्‍टरवर पोहोचले आहे. वाशीम जिल्हा संत्रा उत्पादक संघाची बांधणी करण्यासोबतच ग्रेडींग, वॅक्‍सीन युनिटची उभारणी करण्याचेही प्रस्तावीत आहे. समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून गेला आहे, त्याचा वापर करीत मुंबई-पुण्यासोबतच इतर देशांमध्ये निर्यातीला प्रोत्साहन देण्याचाही विचार शेतकरी करीत आहेत.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव या भागात संत्रा लागवडीखालील थोडे फार क्षेत्र होते. मंगरुळपीर, मानोरा तालुक्‍यातही चार दोन शेतकऱ्यांनी संत्रा लागवड केली आहे. या पीकातून चांगला पैसा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. त्यानंतर या भागात गेल्या दोन वर्षात संत्रा लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ नोंदविली गेली आहे.

सुमारे चार हजार हेक्‍टरने हे क्षेत्र वाढल्याची माहिती करडा कृषी विज्ञान केंद्राच्या सूत्रांकडून देण्यात आली. त्यामध्ये मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, वाशीम या तालुक्‍यांचा समावेश आहे. कृषी विभागाकडून अनुदान वितरीत तसेच यापूर्वीची लागवड असलेल्या बागांची नोंद घेतली जाते. त्यानुसार ६२८२.६५ हेक्‍टर इतके क्षेत्र आहे. मात्र अनुदान न घेता लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद ठेवली जात नसल्याने हे क्षेत्र ११ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक असल्याचा दावा कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आला आहे.

संरक्षित सिंचनाची सुविधा मर्यादीत असल्याने ९९ टक्‍के शेतकऱ्यांद्वारे मृग बहारातील फळाचे उत्पादन घेतले जाते. शास्त्रोक्‍त व्यवस्थापनातून हेक्‍टरी १८ टनाची उत्पादकता मिळविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. गेल्या हंगामात सरासरी दर ३५०० रुपये टनापर्यंत मिळाला होता. काही शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योजकांना ४७०० रुपये प्रती टनाप्रमाणे संत्रा फळांची विक्री केली. फळांचा दर्जा असल्यानेच व्यापाऱ्यांकडून वाढीव दर मिळाला. पूर्वी थेट व्यापाऱ्याला बागा दिल्या जात होत्या, आता प्रती क्रेट दर ठरतो.

असे आहे लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

  • वाशीम ६४४.७५

  • रिसोड ४५०

  • मालेगाव १२८५

  • मंगरुळपीर २८००

  • मानोरा ५८४

  • कारंजा ४८८

  • एकूण ६२८२.६२

राज्याची स्थिती (हेक्‍टर)

  • महाराष्ट्र : एक लाख २५ हजार

  • अमरावती : १ लाख

  • नागपूर : २५ हजार

  • उर्वरित राज्य : २५ हजार

जिल्ह्यात ११ हजार हेक्‍टरपर्यंत संत्रा विस्तारला आहे. ३० ते ४० गावांमध्ये संत्रा लागवड झाल्याने येत्या काळात शेतकरी जिल्ह्याचा संत्रा संघ स्थापन करणार आहेत. त्यासोबतच येत्या काळात ग्रेडींग, व्हॅक्‍सीन युनिटची उभारणी देखील प्रस्तावित आहे. समृद्धी महामार्गाने वाहतुकीसाठी कोल्डस्टोरेजची उभारणी अनुदानातून व्हावी, याकरीता कृषी विभागाकडे पाठपुरावा काही शेतकरी समुह करीत आहेत.

- निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र करडा, वाशीम

पोषक वातावरण व लागवडी योग्य जमीन यामुळे वाशीम जिल्ह्यात संत्र्यांचा विस्तार झाला आहे. आता शासनाने पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

कृषी विभागाच्या प्रोत्साहनामुळे जिल्ह्यात नगदी पीक म्हणून संत्र्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात लागवड क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.

- शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com