Akola : यंदा गावरान आंब्याचा गोडवा होणार कमी

उन्हाळा म्हटलं की लहान थोरांना आंब्याची आठवण होते
mango
mango sakal

शिरपूर : उन्हाळा म्हटलं की लहान थोरांना आंब्याची आठवण होते. आंबट-गोड रसदार आंबे हंगामानुसार उन्हाळ्यातच खायला मिळतात. गावरान आंब्याबरोबर इतर जातीचे आंबे देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात.

मात्र खरी चव व मागणी गावरान आंब्यालाच असते. शिरपूर व परिसरात यंदा मोजक्याच आंब्यांच्या झाडांना फुलोरा आलेला दिसत असल्याने निश्चितच यंदा गावरान आंबे कमी प्रमाणात खायला मिळतील. त्यामुळे यंदा गावरान आंब्याचा गोडवा कमी होणार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

रणरणत्या उन्हाळ्यात आंबा हे फळ मोठ्या प्रमाणात मिळते. हंगामानुसार या दिवसात बाजारात आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात व ते नागरिकांच्या पसंतीस देखील उतरतात. शिरपूर व परिसरात पूर्वी बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर आंब्याची झाडे होती. त्यावेळी बाजारात व गावात सर्वत्र गावरान आंबे मोठ्या प्रमाणात मिळायचे.

शेतकऱ्यांच्या घरोघरी आंबे असायचे, मात्र आंब्याच्या सावलीमुळे पिकात होणारी घट लक्षात घेता बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याची झाडे काढली गेलीत, परिणामी परिसरात आंब्याचे झाडे अगदीच कमी प्रमाणात शिल्लक राहिलीत. त्यात यंदा मोजक्याचा आंब्याच्या झाडांना मोहोर आलेला दिसत असल्याने निश्चितच गावरान आंबे मिळण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

आंबा हा उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी पोषक मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक घरी जेवणात आंब्याचा रस बनतोच, त्यात गावरान आंब्याचा रस असल्यास जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. आंबे खाण्यासाठी या दिवसात प्रत्येक जण आग्रही असतो आणि गावरान आंबे न मिळाल्यास दशहरी, बदामी, नीलम, लालबाग, हापूस आदी आंबे ग्राहक खरेदी करताना दिसतात.

आंबा हे फळ शरीरासाठी पौष्टिक असून उन्हाळ्यात आंबा खायलाच हवा असे जुनेजाणते मंडळी कडून सांगितले जाते. मात्र परिसरात आता गावरान आंब्याची झाडे अगदी कमी झाली. त्यात यंदा मोजक्याच झाडांना मोहर आला असून, त्यामुळे गावरान आंबे कमी प्रमाणात चाखायला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com