Akola : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

Akola : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

अकोला : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यांचे नियोजन व इतर बाबींचे नियोजन करण्यात आले.

जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

दरम्यान सरपंच व सदस्य पदांसाठी पाच हजार ९८५ अर्ज प्राप्त झाल्याने सदर अर्जांची छाननी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली. त्यापैकी सरपंच पदासाठीचे सात तर सदस्य पदासाठीचे ४२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. चार सरपंचपदांची निवडणूक अविरोध झाली असून, चार सरपंचपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने २५८ सरपंच पदांसाठी ९३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

५५४ सदस्यांची निवडणूक अविरोध झाली असून ६६ सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने १ हजार ३५४ सदस्य पदांसाठी ३ हजार २९९ उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात निवडणूक कार्यातील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेवून निवडणुकीचे नियोजन करण्यात आले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उपअधीक्षक नितीन शिंदे, सहा. पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

विविध बाबींचा घेतला आढावा

सदर बैठकीत मतदान पूर्व तयारी. मतदान यंत्रे, (बॅलेट युनिट कंट्रोल युनिट इ.), मतदान केंद्रांवरील सोई सुविधा, संवेदनशील मतदान केंद्र, आवश्यक पोलिस बंदोबस्त, वाहन व्यवस्था, मतदान यंत्रे ठेवण्यासाठी निर्धारित केलेल्या स्ट्रॉंग रुम इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून सुव्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यंत्रणांना दिले.