पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक गावातील शेतात हाकली तिफन

अविनाश बेलाडकर
Tuesday, 16 June 2020

पौराणिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य जपणारे या तालुक्यातील राजनापूर खिनखिनी हे गाव पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतले असून या आपल्या दत्तक गावातील एका शेतात जाऊन त्यांनी आज तिफन चालवूनसोयाबीनची पेरणी केली.

मूर्तिजापूर (जि.अकोला): पौराणिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य जपणारे या तालुक्यातील राजनापूर खिनखिनी हे गाव पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतले असून या आपल्या दत्तक गावातील एका शेतात जाऊन त्यांनी आज तिफन चालवूनसोयाबीनची पेरणी केली.

अकोला जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी राजनापूर हे गाव बच्चू कडू यांनी दत्तक घेतले. 'या गावाचा विकास हाच माझा ध्यास', या वचनपूर्तीसाठी गाव विकास आराखडा संदर्भातील दुसरी बैठक राजेश्वर संस्थानच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात त्यांनी आज घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.फडके, उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार, गट विकास अधिकारी श्री.गाडेकर, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी गाव विकास आराखड्याच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम अंबामाता पाझर तलाव, स्मशानभूमी, गावातील सर्व रस्ते, दलितवस्ती, तीर्थक्षेत्र राजेश्वर संस्थान, शेत रस्ते, पाणलोट क्षेत्र, वनक्षेत्राला संरक्षण भिंत, वन वाटिका, व्यायाम शाळा, वाचनालय क्रीडांगण, सौर पथदिवे, शाळा खोल्या, बांधकाम बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांसाठी उद्योग उभारणे, गावात उद्योग क्षेत्र तयार करणे. या सर्व कामांचे आठ दिवसांमध्ये अंदाजपत्रक तयार करणे व सर्व कामांना गती देणे याबाबतआढावा घेऊन संबंधितांना पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

 गावांमध्ये आर ओ फिल्टर, गरम आणि थंड पाण्याचं एक वाटर फिल्टर, ग्रामपंचायत अंगणवाडी शाळा आणि मंदिर आणि समाज मंदिरास पाणीपुरवठा करणारा मोटर पंप सुद्धा सौरऊर्जेवर उभारण्या संदर्भातील विकासात्मक कामाचा आढावा त्यांनी घेतला व संपूर्ण काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल असे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले. या गावाला स्मार्ट व्हिलेज पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या पुरस्काराची धनादेश स्वरूपातील रक्कम पालकमंत्र्यांनी सरपंच प्रगती रुपेश कडू यांच्या सुपूर्द केली. ग्राम सचिव संदीप गाडेकर यांनी सभेत सविस्तर माहिती त्यांना दिली. सूत्रसंचालन रूपेश कडू यांनी केले. उज्लवला साबळे, अरविंद साबळे, मयूर साबळेआनिल देशमुख, उमेश गुडदे, अतुल आंबुलकर दीवाकर सेजव उपस्थित होते.

त्यानंतर पालकमत्र्यांचा मोर्चा वळला गावातील अंबामाता तलावाकडे. तलावाची पहाणी करून त्यात अधिकाधिकजलसाठा होण्याच्या दृष्टीने कामाला लागण्याचे निर्देश देतांनाच लगतच्या प्रशांत साबळे यांच्या शेतात सुरू असलेल्या पेरणीने त्यांचे लक्ष वेधले. त्यांच्यातील शेतकरी जागृत झाला व त्यांनी लगेच शेतात जाऊन तिफन हाकली. सोयाबीन, तुरीची कासराभर पेरणी केली, वृक्षारोपणही के आणि अकोल्याकडे रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Guardian Minister Bachchu Kadu drove a tiffany in a field in the adopted village