अकाेला : रुग्णवाहिकेत डिझल नसल्याने बालिकेचा मृत्यू

दोषींवर कारवाईची मागणी; अधिकाऱ्यांची चाल-ढकल
tribal newborn girl died due to lack of diesel in ambulance
tribal newborn girl died due to lack of diesel in ambulancesakal

हिवरखेड : येथून जवळच असलेल्या दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा व आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड येथील आदिवासी नवजात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ता. २६ जून रोजी घडल्याने आरोग्य विभागाविषयी नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. बालिकेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृतक बालिकेच्या पालकाकडून करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरखेड येथील आदिवासी नागरिक लखन श्रीराम शेलुकार (वय ३१) यांच्या पत्नी मीना शेलुकार (वय २५) ह्या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांना ता. २६ जून रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान अचानक मुदतपूर्व प्रसुती कळा सुरू झाल्या. आशा सेविकेला माहिती दिल्यावर त्यांनी गरोदर महिलेची पाहणी करून तत्काळ दानापूर येथील १०२ रुग्णवाहिका चालक श्री.कानपुरे यांना फोन करून येण्यास सांगितले.

परंतु, तेल्हारा येथील एका पेट्रोल पंपावर आरोग्य विभागाचे डिझलचे खाते असून, त्या पेट्रोल पंपवर अनेक दिवसांपासून डिझल उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहिकेतही डिझल नाही, त्यामुळे मी, रुग्णवाहिका घेऊन येऊ शकणार नाही, असे उत्तर रुग्णवाहिकेचे चालक श्री.कानपुरे यांनी सांगून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दानापूर आरोग्य केंद्रात यावेळी कोणतेही अधिकारी हजर नसल्यामुळे गरोदर महिलेला दानापुरात आणून काहीच फायदा होणार नसल्याची माहिती आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने दिली.

आरोग्य केंद्राकडून कोणतीही मदत न मिळाल्याचे पाहून शेवटी सकाळी चार वाजताच्या दरम्यान गरोदर महिलेला घरीच मुदतपूर्व प्रसुती झाली. प्रसुती झाल्यानंतर नवजात बालिकेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आशाने पुन्हा दानापूर येथील आरोग्य विभागाशी व तेल्हारा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. परंतु, कोणतीही मदत त्यांना मिळू शकली नाही. शेवटी शेलुकार दाम्पत्याने आशाबाईसह हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. येथील डॉ.अरींजय बांडे यांनी बाळाला ऑक्सिजन लावून प्राथमिक उपचार केला. याठिकाणी १०८ रुग्णवाहिका हजर असल्यामुळे डॉ.नीरज गणात्रा हे तत्काळ अकोलाकरिता निघाले. परंतु, अकोटला पोहोचेपर्यंत सदर बालिका रस्त्यातच दगावली.

पर्यायी व्यवस्था करून दिली असती

१०२ रुग्णवाहिकेच्या चालकाने डिझल नसल्याचे कारण सांगून रुग्णवाहिका नाकारली. याबाबत तेल्हारा येथील पेट्रोल पंपचे व्यवस्थापक दीपक म्हात्रे यांना विचारणा केली असता, तीन दिवसाधी डिझल मशीन इंटरलॉक झाली होती. परंतु, आता आमच्याकडे डिझल उपलब्ध असून, डिझलची कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर डिझेल उपलब्ध नसते, तर आम्ही रुग्णवाहिकेला पर्यायी व्यवस्था करून दिली असल्याचीही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिकाऱ्यांची चालढकल

दानापूर आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी कोणतेही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.आडे आहेत. घटना घडली त्यावेळी डॉ.व्यवहारे यांची ड्युटी असल्याचे डॉ.आडे यांनी सांगितले. डॉ.व्यवहारे यांना विचारणा केली असता, डॉ.काळे यांची ड्युटी असल्याचे सांगितले, डॉ.काळेंना विचारले असता, डॉ.व्यवहारेंचीच ड्युटी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घडलेल्या घटनेवर संबंधित अधिकारी एकमेकांकडे हात दाखवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

वेळेवर १०२ रुग्णवाहिका न आल्याने व दानापूर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याची माहिती मिळाल्याने माझ्या पत्नीची घरीच मुदतपूर्व प्रसुती झाली. माझ्या मुलीच्या मृत्यूस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

- लखन शेलुकार, पिंपरखेड.

झालेला प्रकार गंभीर असून, मृतक बलिकेच्या पालकांनी लेखी तक्रार दिल्यास संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.

- प्रवीण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, तेल्हारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com